• Fri. Jun 14th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 85 Today: 1 Total: 3585526

मुंबई दि. १८ मे –

पराजय समोर दिसत असल्याने तुतारीचा आवाज अजिबात झालाच नसल्यामुळे वैफल्यग्रस्त… निराश आणि हताश झालेले अनिल देशमुखांसारखे नेते खालच्या पातळीवर येऊन संभ्रम निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केला.

संपूर्ण लोकसभा निवडणुकीत तुतारीचा आवाज कुठेच दिसला नसल्याने ही मंडळी वैफल्यग्रस्त झाली आहे. अनिल देशमुख आमच्यासोबत येणार होते त्यांना मंत्री पद हवे होते मात्र भाजपने मंत्री पद देण्यास नकार दिला त्यामुळेच ते तिथे राहिले आहेत असा गौप्यस्फोट करतानाच अनिल देशमुख यांनी त्यांच्याबाबतीत माझ्याकडून जे काही सहकार्य झाले त्याची मनात जाण ठेवून वक्तव्य केले असते तर बरे झाले असते. माझी आणि शरद पवार, जयंत पाटील यांची भेट होण्याचे कारणच असू शकत नाही असे चर्चेला पूर्णविराम देताना सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

नाशिक दौऱ्यावर असताना हॉटेलला वॉशरुमसाठी गेलो. तीन – चार मिनिटे थांबलो. सुदैवाने तिथे त्यांच्या कार्यालयात काम करणारा दत्ता नावाचा हेमंत टकले यांच्या गाडीचा चालक भेटला आणि तो रायगड लोकसभा मतदारसंघातील रोहा येथील होता. त्याला शरद पवार यांचा पीए सुनिल रानडे याने फोनवर माझ्या विरोधात मतदान करायला सांगितले असे त्याने सांगितले. माझ्या गावात अनेक विकासकामे अदिती तटकरे आणि तुम्ही केली असल्याचे त्याने बोलताना सांगितले. शिवाय ९५ टक्के मतदान तुम्हालाच होणार असल्याचे रानडे यांना ठणकावून सांगितल्याचे दत्ताने सांगितले. विकृत मनोवृत्तीचा केला जाणारा हा प्रचार थांबवावा. अशी वैफल्यग्रस्त विधाने करत असताना खोटेपणाचा कळस कसा असू शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे माझ्यासंदर्भात अनिल देशमुख यांनी केलेले विधान आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्यातील नाशिक आणि पालघर या दोन लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची, नाशिकमधील सर्व विधानसभा सदस्यांची बैठक घेऊन प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पक्षाच्या माध्यमातून करावयाची महत्वपूर्ण भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडली. गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे, गिरीश महाजन यांच्याशीही चर्चा झाली. अखेरच्या टप्प्यात महत्वपूर्ण नियोजन करण्याच्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण क्षमतेने दोन्ही लोकसभा मतदारसंघात काम करत आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

आमचे नेते छगन भुजबळ यांच्याशीही प्रदीर्घ चर्चा झाली असून त्यांच्याकडून या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थिती व राजकीय स्थिती आणि निवडणूक नियोजन याची माहिती घेतली. नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुतीला यश मिळेल असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

याशिवाय डहाणू येथे पालघर लोकसभा मतदारसंघाची बैठक घेतली. पालघर, वसई विरार येथील पदाधिकारी उपस्थित होते. त्यावेळी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यासोबतही चर्चा केली. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. अखेरच्या टप्प्यातही महायुतीला अनुकूल वातावरण असून महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील असा दावाही सुनिल तटकरे यांनी केला.

महाराष्ट्रात कॉंग्रेसची वाट बिकट करणारे पृथ्वीराज चव्हाण यांचे वक्तव्य फारसे गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. त्यांना स्वतःला कधी आपल्या मतदारसंघात फारसे यश राजकीयदृष्ट्या कार्यकर्त्यांना मिळवून देता आले नाही. त्यांनी अशा गप्पा करण्याची आवश्यकता नाही असा टोला सुनिल तटकरे यांनी लगावला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते सुरज चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *