मुंबई, दि. १८ मे :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांना जेलमध्ये टाकण्याचे काम केले. परंतु हिंदुस्थानची जनता रशिया, बांग्लादेश, पाकिस्तान सारखी परिस्थीती होऊ देणार नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान कोणत्याही परिस्थितीत अबाधित ठेवू. भाजपा, आरएसएस व नरेंद्र मोदींनी लाख प्रयत्न केले तरी ते संविधानाला हात लावू शकणार नाहीत, बदलू शकणार नाहीत आणि तसे प्रयत्न केले तर भाजपाचे नामोनिशान राहणार नाही, अशा इशारा काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी दिला.
बीकेसी मैदानावर इंडिया महाविकास आघाडीच्या परिवर्तन सभेत खर्गे बोलत होते, ते पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी नेहमी प्रश्न विचारतात की, ७० वर्षात काँग्रेसने काय केले? काँग्रेसने लोकशाही व संविधान वाचवले नसते तर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान कधीच झाले नसते. मोदींची गॅरंटी खोटे बोलणे आहे. १५ लाख रुपये देणार, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करु असे म्हणाले पण मोदींनी यातील काहीही केले नाही. काँग्रेस आघाडीचे सरकार आले तर तुमच्या दोन एकर जमिनीतून तर एक एकर जमीन मुस्लीमांना देतील, दोन म्हशी असतील तर त्यातील एक म्हैस मुस्लीमांना देतील ही पंतप्रधानाची भाषा आहे का? ज्या दिवशी मुस्लीमांच्या विरोधात बोलेन त्या दिवशी सार्वजनिक जिवनातून निवृत्त होईन म्हणाले व दुसऱ्याच दिवशी हिंदू मुस्लीमावरच बोलले. नरेंद्र मोदी एससी, एसटी, मागास समाजाला काहीही देऊ इच्छित नाहीत. ३० लाख सरकारी पदे रिक्त आहेत पण मोदींनी जागा भरल्या नाहीत. महागाई, बेरोजगारीवर बोलत नाहीत. नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत येणार नाहीत तर इंडिया आघाडी ३०० जागा जिंकून सत्तेत येईल असा विश्वासही खर्गे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी विचाराने सोबत नसलेल्यांना जेलमध्ये टाकले आहे. विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना मोदींनी जेलमध्ये टाकले. बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना कठीणवेळी मदत केली त्याचा त्यांना विसर पडला आहे. यावेळची लढाई ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान वाचवण्याची आहे. भटकती आत्मा अशी टीका केलेल्या नरेंद्र मोदींना सडतोड उत्तर देत शरद पवार म्हणाले की, हा आत्मा तुम्हाला सत्तेतून घालवल्याशिवाय शांत बसणार नाही.