Sunday, June 22, 2025
Homeताज्या बातम्याविरोधकांच्या छातीत धडकी भरली..

विरोधकांच्या छातीत धडकी भरली..

छत्रपती संभाजी नगर, ता. ११ मे  :

लोकसभा निवडणुकीतील आतापर्यंत पार पडलेल्या तिन्ही टप्प्यात महायुती बाजी मारणार आहे. चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात सरकारने केलेल्या विकासकामांची पोचपावती मतदार देतील असा विश्वास व्यक्त करत महायुती जिंकणार म्हणून विरोधकांच्या छातीत धडकी भरली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमदेवाराच्या प्रचारासाठी वैजापूरमध्ये आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. छत्रपती संभाजी नगरच्या नामांतरावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे. बाळासाहेबांचे मुंबई, ठाण्यानंतर छत्रपती संभाजी नगरीवर प्रेम होते. त्यामुळे शिवसेनेने मुंबई, ठाण्यानंतर संभाजीनगरमध्ये तिसरी डरकाळी फोडली होती, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्याच्या मुलाने मुख्यमंत्री होऊ नये आणि फक्त सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांनीच मुख्यमंत्री व्हायचे असा कायदा आहे का ? असा सवाल करत मुख्यमंत्री असताना तुम्ही काय केले असे खुले आव्हान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठाला दिले.

मुख्यमंत्री असताना ते उघड्या डोळ्यांनी शिवसेना संपत असताना पाहत राहिले. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना आणि धनुष्यबाण बांधला होता. तो आम्ही सोडविण्याचे काम केले. शिवसेना वाचविण्याचे काम केले आहे. शिवसैनिकांचे होणारे खच्चीकरण थांबविण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशासाठी जीवन समर्पित केले आहे. त्यांना गाडण्याची भाषा काही लोक करत आहे. त्यांची कबर खोदण्याची भाषा करतात. त्यांच्यामध्ये ही हिंमत आहे का? असे खुले आव्हान मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

वैजापूर शहराचा पाणी प्रश्न सोडविल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. दुष्काळी जिल्ह्यांना न्याय देण्याचे काम सरकारने केले आहे. माझ्यावर होणाऱ्या टीकेला मी टीकेने नाही तर कामातून उत्तर देतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

लोकप्रिय

टिप्पण्या