• Mon. Jan 20th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 124 Today: 1 Total: 4007868

मुंबई, दि. २६ एप्रिल;
कांदा निर्यातबंदी करून मोदी सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असून कांदा निर्यातबंदी उठवावी अशी मागणी शेतकरी करत असताना त्याकडे केंद्रातील मोदी सरकारने दुर्लक्ष केले. आता लोकसभा निवडणुका सुरु असताना मोदी सरकारने गुजरातमधील २ हजार मेट्रीक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. गुजरातला परवानगी देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेजारचा महाराष्ट्र का दिसला नाही. मोदी सरकारचा हा अजब न्याय असून गुजरातला कांदा निर्यातीस परवानगी देता मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी काय पाप केले आहे? असा संतप्त सवाल प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी विचारला आहे.

यासंदर्भात बोलताना अतुल लोंढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे याचा सातत्याने प्रत्यय येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवातीला चांगला भाव मिळाला, शेतकऱ्यांच्या खिशात चार पैसे पडत असताना मोदी सरकारने कांदा निर्यात बंदी केली व कांद्याचे भाव घसरले. कांदा निर्यातबंदी उठवावी यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी मागणी करत आहेत परंतु महाराष्ट्राच्या व इतर राज्यातील शेतकऱ्यांकडे मोदी सरकारने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले व आता अचानक गुजरात राज्यातील कांदा निर्यातील परवानगी दिली आहे. नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान नसून ते केवळ गुजरातचे पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत. मोदी सरकार गुजरातला कांदा निर्यातीची परवानगी देत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे काय झोपा काढत होते का? मोदींकडे जाऊन कांदा निर्यात बंदी उठवण्याची धमक या नेत्यांमध्ये नाही का? असा सवाल उपस्थित करत कांदा उत्पादक शेतकरी मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाहीत, असेही अतुल लोंढे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *