• Sun. May 19th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 73 Today: 1 Total: 3557798

मुंबई, दि. १४ एप्रिल :

नरेंद्र मोदींच्या पाठींब्याचा निर्णय पक्षाचा विचार करून घेतला आहे, ज्यांना तो समजतच नसेल त्यांनी त्यांना वाटेल तो निर्णय घ्यावा असे स्पष्ट करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोदींच्या नेतृत्वाची तोंडभरून स्तुती केली. जरी राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असला तरी जर नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते हे राम मंदिर उभंच राहिलं नसतं, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, १९९२ च्या आंदोलनाच्या वेळेला कारसेवकांना घातलेल्या गोळ्या, कारसेवकांची शरयू नदीत वाहणारी प्रेतं ही दृश्य लोकांनी पाहिली होती. ती दृश्य खूप चीड आणणारी होती. ह्या राम मंदिरासाठी कार सेवकांनी स्वतःच्या आयुष्याची आहुती दिली. त्यामुळे इतक्या त्यागानंतर मंदिर उभं राहिलं त्याच्याबद्दल मला प्रचंड आनंद आहे.

२०१४-२०१९ या काळात नरेंद्र मोदी सरकारवर जी टीका केली ती व्यक्तिगत टीका नव्हती तर मुद्द्यांवरची टीका होती. आणि गेल्या ५ वर्षात ज्या चांगल्या गोष्टी मोदींच्या सरकारने केल्या, त्याचं कौतुक देखील मी केलं. काश्मीरमधून ३७० कलम हटवणं, अयोध्येत राम मंदिर उभारल्यावर त्याचं कौतुक पण मीच केलं होतं. धर्माच्या आधारावर आपल्याला राष्ट्र उभं नाही करायचं आहे, परंतु १९९२ पासून २०२४ पर्यंत राम मंदिर रखडलं होतं, जे २०२४ ला उभं राहिलं ह्याचा निश्चित मला आनंद आहे आणि ह्याचं कौतुक पण मी केलं.

एनआरसीचा विषय असेल, ३७० कलमाचा विषय असेल किंवा राम मंदिराचा विषय असेल, नरेंद्र मोदी पंतप्रधान नसते, तर हे विषय प्रलंबितच राहिले असते. त्यामुळे मी अनेक वेळा मोदींना फोन करून त्यांचं चांगल्या कामांसाठी व्यक्तिशः अभिनंदन देखील केलं आहे. त्यामुळे अजून काही चांगल्या गोष्टी घडवायच्या असतील तर एका बाजूला कडबोळं नेतृत्व आणि दुसरीकडे एक सक्षम नेतृत्व असा पर्याय असताना नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाला अजून एक संधी मिळायला हवी असं मला वाटलं आणि त्यातून नरेंद्र मोदींना पाठींबा द्यायचा निर्णय आमच्या पक्षाने घेतला.

महाराष्ट्रासाठी नरेंद्र मोदींकडे काही मागण्या आहेत. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापासून ते महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचं संवर्धन करणं आणि तसंच मी सभेत म्हणलं तसं की तरुण-तरुणींना उत्तम शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात ह्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. आणि सर्व राज्यांना एकसमान वागणूक मिळायला हवी.

भाजप-शिवसेना- राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आमच्या पक्षातील कोणाशी प्रचारासंबंधी संपर्क करायचा आहे ह्याची यादी लवकरच पक्षाकडून संबंधितांना कळवली जाईल, त्यांनी त्यांच्याशीच संपर्क करावा. आणि माझ्या सहकाऱ्यांना, ह्या उमेदवारांनी मानानेच वागवलं पाहिजे. प्रचारासाठी सभा घ्यायच्या, कुठे घ्यायच्या ह्याचा निर्णय चर्चेअंती घेतला जाईल असेही राज ठाकरे यांनी सांगितले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *