• Sun. May 19th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नसलेल्यांना सत्तेतून बाजूला करा..

Visits: 142 Today: 2 Total: 3556375

इंदापूर, दि. २३ मार्च :

ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. महागाई, बेकारी, भ्रष्टाचार वाढला आहे. हे घालवायचं असेल तर चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेपासून बाजूला करणे, हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपवर केला.

इंदापूरातील शेतकरी मेळाव्यात शरद पवार म्हणाले की, आज २०२४ वर्ष सुरू आहे तरीही शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं नाही. सरकारने कांदा निर्यातंबदी केली. त्यामुळे कांद्याचे भाव पडले. कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर आला. कापूस उत्पादक हवालदिल झाला पण सरकारला त्याची काहीच काळजी नाही. प्रधानमंत्र्यांवर टीका केली म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री आज तुरुंगात आहेत. आज काँग्रेस पक्षाचे खाते गोठवले, उद्या तुम्ही विरोधात भूमिका घेतली तर तुमचेही खाते बंद करतील. आघाडीचे उमेदवार निवडून आणणे हे तुमचे आणि माझे कर्तव्य आहे असे शरद पवार म्हणाले.

या निवडणुकीत सुप्रिया सुळे उमेदवार आहेत. तीनदा तुम्ही त्यांना संधी दिली. देशाच्या संसदेत पहिले दोन जे खासदार आहेत. ज्यांची उपस्थिती ९८ टक्के आहे. सगळ्या महत्वाच्या गोष्टींवर मांडणी करतात. संसदेत तुमच्या खासदाराचं नाव देशात दोन नंबरला आहे. आज आपलं चिन्ह बदललं, तुतारी लक्षात ठेवा आणि मतांचा विक्रम करा असे आवाहन शरद पवार यांनी इंदापूरकरांना केले.

साखर निर्यातीतून दोन पैसे जास्त मिळतात पण, केंद्राने सांगितलं की तुम्हाला साखर निर्यात करायची असेल तर आम्ही निर्यातीवर कर आणि जीएसटी लावू. त्याचा परिणाम असा झाला की आज कारखान्यात साखरेचे पोते पडून आहेत. यावर तोडगा म्हणून प्रधानमंत्र्यांनी इथेनॉल करायला सांगितले. कारखान्यांनी तयारही केले नंतर मात्र बंधन घातले. याचा मोठा फटका कारखान्यांना बसला यावरून दिसतं की ज्यांच्या हातात सत्ता त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण नाही. त्यामुळे आता चुकीचे निर्णय घेणाऱ्यांना सत्तेतून बाजूला करा असे शरद पवार म्हणाले.

सरकार विरोधकांना अडचणीत आणत आहेत. झारखंडचा मुख्यमंत्री तुरुंगात टाकला आता केजरीवाल यांनाही तुरुंगात टाकले. सत्तेचा वापर विरोधकांना तुरुंगात टाकण्यासाठी केला जात आहे. काँग्रेसचे बँक खाते सुद्धा या लोकांनी गोठवले. व्यवहार बंद केला. उद्या तुमचंही खातं ते बंद करतील. एवढी टोकाची भूमिका या राज्यकर्त्यांची आहे. यासाठी या लोकांचा पराभव करा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *