ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि पुण्यातील नॅशनल सेंटर फॉर रेडिओ एस्ट्रोफिजिक्स (एन.सी.आर.ए.) संस्थेचे संस्थापक संचालक डॉ. गोविंद स्वरूप यांचे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. गेल्या दहा दिवसांपासून ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते.
डाॅ. गोविंद स्वरुप हे भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक मानले जातात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातली पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबई जवळ कल्याणमध्ये उभारण्यात आली. या दुर्बिणीच्या मदतीने सूर्याची निरीक्षणे घेण्यात आली. उटी येथेही रेडिओ दुर्बीण उभारण्यात आली. त्यानंतर पुण्यापासून ८० किमी अंतरावर असलेल्या खोडद-नारायणगाव येथे जगातलील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय दुर्बीण उभारण्याचे कामही त्यांनीच केले. गोविंद स्वरूप यांना पद्मश्री, भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते
डॉ. स्वरुप यांना विविध व्यक्ती व संघटना यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. डाॅ. स्वरुप यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले आहे. “वैज्ञानिक दृष्टीकोन विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे व देशात विज्ञानाच्या अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल”, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली.
डॉ. गोविंद स्वरुप हे भारतातील रेडीओ खगोल शास्त्राचे जनक होते. देशविदेशात त्यांनी उभारलेल्या अत्याधुनिक रेडीओ दुर्बीणींनी मानवाला सूर्याचा वेध घेण्याची शक्ती दिली. पुण्यातील खोदड-नारायणगाव तसेच उटी येथे त्यांनी उभारलेल्या महाकाय दुर्बिणींच्या माध्यमातून त्यांच्या स्मृती चिरंतन राहतील व युवकांना रेडिओ खगोलशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रेरीत करतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.