नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा…
अकोला, दि. १४ जानेवारी –
गेली अनेक वर्ष आपले राज्य मागे गेले आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात अडीच वर्षात महाराष्ट्राचे वाटोळे झाले. महाराष्ट्र ठप्प होता, असा जोरदार हल्लाबोल भाजपा विधानपरिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी अकोल्यात पार पडलेल्या महायुतीच्या मेळाव्यात केला. आपल्याला या देशासाठी काम करायचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला कर्तव्यदक्ष कार्यकर्ता म्हणून भूमिका पार पडायची आहे, असे आवाहनही दरेकरांनी केले.
दरेकर म्हणाले की, अकोला जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा आहे. ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अकोला जिल्ह्याचे वेगळे स्थान आहे. अकोल्यातील या मेळाव्याकडे आज सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. अनेक वक्त्यांनी महायुतीचा मेळावा कशासाठी? याचा उल्लेख केला. परंतु आपल्याला या मेळाव्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला, अकोल्यातील जनतेला सांगू इच्छितो की आता राजकारणाची दिशा बदलली आहे. जे लोकांना, नवीन पिढीला हवे ते जर राजकारण्यांनी दिले नाही तर जनता आपल्या सोबत राहत नाही. नवीन पिढीला विकासाची भाषा कळते. जुन्या पिढीसारखे जाती पातीचे राजकारण नवीन पिढीला नकोय. विकासाची भुमिका घेणारं राजकारण हवेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला विकासाचे राजकारण दाखवले. विकासावर राजकारण करून निवडणुका जिंकता येतात हे मोदींनी देशाला दाखवून दिले आहे.
देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते परंतु मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री म्हणून जायला त्यांना काही वाटले नाही. एकनाथ शिंदे सत्तेत मंत्री होते, नगरविकास मंत्री होते. सत्ता सोडण्याची त्यांना गरज नव्हती अजित पवार तर उपमुख्यमंत्री होते. विधान सभेचे विरोधी पक्षनेते होते. या तिन्ही नेत्यांनी ठरवले या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे राहायचे ठरवले असेल तर आम्ही सगळ्या भिंती तोडून विकासाच्या बाजूने आणि विकासपुरुष नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेले पाहिजे ही भुमिका घेऊन महायुती निर्माण झाली.
एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. एक संवेदनशील कार्यकर्ता, नेता म्हणून महाराष्ट्र त्यांना पाहतो. प्रचंड मेहनती, कष्ट करणारा नेता आहे. दुसऱ्या बाजूला आमचे नेते देवेंद्र फडणवीस पाच वर्ष या राज्याचे मुख्यमंत्री राहिल्यानंतर राज्य कारभार कसा करावा, विकास काय असतो ही दृष्टी त्यांनी महाराष्ट्राला दाखवली. असे अभ्यासू आमचे नेतृत्व आहे. अजित पवार यांचीही प्रशासनावर पकड आणि जरब आहे. म्हणजे तिन्ही क्वालिटीचे तीन नेते एकत्र झाल्यावर महाविकास आघाडीची आपल्यासमोर डाळ शिजेल का? असा सवाल करत दरेकर म्हणाले की, तीन बलाढ्य नेते आज एकत्र आहेत. पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद आहे. जिल्ह्याजिल्ह्यात तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांची फौज एकदिलाने काम करण्यासाठी सज्ज झालेली आहे. त्यामुळे येणारा काळ हा आपला असल्याचेही दरेकर म्हणाले.
मुंबईत जे राज्यमंत्री होते, माजी खासदार होते त्या मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. उद्धव ठाकरेंची शिवसेना गेली, शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष गेला आता काँग्रेसलाही मिलिंद देवरा यांच्या निमित्ताने घरघर लागल्याचे पाहायला मिळत आहे. मुरली देवरा म्हणजे काँग्रेसचा चेहरा होता. मुंबई काँग्रेस म्हटले की मुरली देवरा असे समीकरण होते. आज त्यांचे चिरंजीव काँग्रेसची कास सोडून आपल्यासोबत येताहेत. मिलिंद देवरा यांनी सांगितले मला विकासाच्या राजमार्गावर जायचे आहे. त्यांनाही वाटते विकास काँग्रेस करू शकत नाही. या देशात, राज्यात विकास करण्याची दुसरी कोणाच्यात क्षमता नाही. जर विकास करायचा असेल तर एकमेव नेता आहे ज्याचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे. तेच या देशाला विकासाकडे नेऊ शकतात. येणाऱ्या काळात आणखी लोकं आपल्याकडे येणार असल्याचे सुतोवाचही दरेकर यांनी केले.
सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास, हा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला. गेल्या १० वर्षाच्या काळात देशाला प्रगती पथावर नरेंद्र मोदींनी नेले आहे. कधीकाळी आपल्या देशाला गरिबांचा देश म्हणून हिणवले जायचे. आज काय परिस्थिती आहे. आज पंतप्रधान मोदी परदेशात गेले तर तेथील राष्ट्रपती त्यांना सेल्यूट करतात. हा आपल्या भारत देशाचा मान वाढविण्याचे काम मोदींनी केले आहे. पंतप्रधान मोदी, भाजपा सत्तेवर येण्याआधी आपला देश हा जगात १० वी अर्थव्यवस्था म्हणून ओळखला जायचा. पंतप्रधान मोदींनी आपल्या देशाला ५ व्या अर्थव्यवस्थेवर नेले आहे. ज्यावेळी या देशातील जनता मला तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवेल त्यावेळी जगातील तिसरी अर्थव्यवस्था भारत देश असेल हा विश्वास त्यांनी दिला आहे. त्या विश्वासाला पाठिंबा देण्यासाठी महायुती राज्यात काम करत आहे. गेली ४०-५० वर्ष जे काँग्रेसला जमले नाही ते करून दाखवण्याचे काम मोदींनी केले असल्याचेही दरेकर म्हणाले.
राज्याचे तिन्ही नेते भक्कम आहेत. ज्यावेळी सरकार स्थापन झाले केंद्राने हजारो कोटींचा निधी आपल्याला दिला. उबाठा सरकार असताना त्यांना दिल्लीला जायला लाज वाटत होती. घरात बसून राज्याचा कारभार चालवला.अडीच वर्षाच्या काळात राज्यातील जनतेला अभिमान वाटेल असे काम केले नाही. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले देवेंद्र फडणवीस, अजित पवार वारंवार दिल्लीला जाताहेत. प्रश्न मानअपमानाचा नाही तर महाराष्ट्राच्या विकासाचा आहे. तिन्ही नेते दिल्लीला गेल्यावर कधीच खाली हात आले नाही. कारण आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्राला भरभरून देताहेत. येणाऱ्या काळात विकासामध्ये देशात सर्वात पुढे असणारे राष्ट्र असेल तर महायुतीचे सरकार असलेले महाराष्ट्र राज्य असेल, असा विश्वास दरेकर यांनी दिला.
