सरकारविरोधात NCP चा शेतकरी आक्रोश मोर्चा.
मुंबई,दि. १ डिसेंबर :-
दुष्काळ, नापिकी, अवकाळी पाऊस आणि शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरी आक्रोश मोर्चा काढणार आहे. या मोर्चा दरम्यान ट्रॅक्टर रॅलीचेही आयोजन करण्यात आले आहे. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी जळगाव येथे, १ डिसेंबर २०२३ रोजी दिंडोरी येथे तर ५ डिसेंबर रोजी अमरावती येथे हा मोर्चा निघेल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
यावेळी पत्रकारांना संबोधित करताना जयंत पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. आधी दुष्काळाने होरपळलेला शेतकरी, अवकाळी पावसाने हैराण झाला आहे. कालच्या पावसामुळे आलेली पिकेही वाया गेली. काही पिकांवर रोगराई पसरली आहे. जी पिके शिल्लक आहेत त्यांना बाजारभाव व्यवस्थित मिळत नाही. एकंदरच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातला शेतकरी हवालदिल झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या या महत्त्वाच्या विषयावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आमचा हा शेतकरी आक्रोश मोर्चा असेल असे त्यांनी सांगितले.
या सरकारची अडचण अशी आहे की, त्यांना काहीही सांगितले तर ते महाविकास आघाडीकडे बोट दाखवतात. पण आज ते स्वतः काय करतायेत हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात कोरोनाचं संकट एवढं प्रचंड मोठं असताना देखील महाविकास आघाडी शेतकऱ्यांच्या बाजूनं उभी राहिली. शेतकऱ्यांना कधीही पैसे कमी पडून दिले नाहीत. प्रत्येक संकटं जेव्हा जेव्हा आली त्यावेळी शेतकऱ्यांच्या मागं सरकार उभं राहलं आहे. हा त्यावेळेचा सगळ्यांचा अनुभव आहे. आज सरकारतर्फे नुसत्या घोषणा होत आहेत व त्या घोषणांची अंमलबजावणी काही होत नाही असे म्हणत त्यांनी सरकारचे कान टोचले.