• Tue. Feb 27th, 2024

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 31 Today: 1 Total: 3422479

शेतकऱ्यांना आधी मदत द्या त्यानंतर दौरे करा…

मुंबई, दि. ३० नोव्हेंबर.

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे, हे वर्ष शेतकऱ्याचे मोठे नुकसान करणारे ठरले आहे. नैसर्गिक संकटात अडकलेला शेतकरी सरकारकडे मदतीची आशा लावून बसलेला असताना भाजपा सरकार मात्र केवळ घोषणाबाजी व जाहीरातबाजी करत आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत केवळ कोरड्या घोषणा करण्यात आल्या. आता मंत्री नुकसानीचा दौरा करत आहेत, हा केवळ देखावा आहे. मंत्र्यांनी दौरे करावेत पण आधी शेतकऱ्याच्या हातात भरीव मदत द्या, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक संकटाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप हंगामानंतर आता रब्बी हंगामही वाया गेला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतमालाचे मोठे नुकसान केले आहे, शेतातील उभी पिके, द्राक्ष, संत्रा, कांदा, सोयाबिन, तूर, धान, कापूस सर्व पिकं वाया गेली आहेत. शेतकरी संकटात असताना सरकारने तात्काळ मदत जाहीर करून ती शेतकऱ्यांपर्यंत पोहवण्याचे काम केले पाहिजे पण सरकार मात्र पोकळ घोषणा करत आहे. याआधी जाहीर केलेली मदतही शेतकऱ्यांपर्यंत अद्याप पोहचलेली नाही. भाजपा सरकार हे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत आहे. सरकारच्या तिजोरीतून विमा कंपन्यांचे खिसे भरले आणि आता शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ आली तर पिकविमा कंपन्या शेतकऱ्यांना पैसे देत नाहीत. शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे. काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, टोकाचे पाऊल उचलू नये. शेतकऱ्यांना मदत मिळेपर्यंत काँग्रेस पक्ष सरकारकडे पाठपुरावा करत राहिल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *