भाजपा खा. रमेश बिधुरींना तात्काळ निलंबत करा.
मुंबई, दि. २४ सप्टेंबर;
भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी खासदार कुंवर दानिश अली यांच्याबद्दल लोकसभेत केलेले अपमानास्पद वक्तव्य चिंताजनक आहे. बिधुरी यांनी केवळ एका खासदाराचा अपमान केला नाही तर संसदेचा, आपल्या लोकशाहीच्या पवित्र मंदिराचा अपमान केला आहे. खासदार रमेश बिधुरी यांचे वक्तव्य लोकशाही परंपरांसाठी लाजिरवाणे आहे. बिथुरी यांनी सर्व संसदीय परंपरा धाब्यावर बसवून लोकसभा सदस्यासाठी गुंडासारखी रस्त्यावरची भाषा वापरली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हा प्रकार गांभिर्यांने घेऊन खासदार रमेश बिधुरी यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.
यासंदर्भात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान पुढे म्हणतात की, रस्त्यावरील भांडणावेळी वापरला जाणारी भाषा आता संसदेत शिरली हे अत्यंत दुर्दैवी आणि अस्वस्थ करणारे आहे. यामुळे केवळ संसदेचा दर्जाच कमी होत नाही तर परस्पर आदर, समजूतदारपणा आणि बंधुभाव या तत्त्वांनाही धोका निर्माण झाला आहे. लोकसभा अध्यक्षांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष करु नये किंवा केवळ समज देऊन सोडू नये. लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधिर रंजन चौधरी यांना निरव मोदींचे नाव घेतले म्हणून निलंबित केले होते. विरोधी पक्षांच्या खासदारांना अगदी किरकोळ कारणावरून तात्काळ निलंबित केले जाते. राहुलजी गांधी यांना खोट्या केसमध्ये अडकवून दोषी ठरवले गेल्यानंतर अवघ्या २४ तासात त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची तत्परता लोकसभा सचिवालयाने दाखवली होती. आता तर रमेश बिधुरींनी दानिश अली या संसद सदस्याला अतिरेकी संबोधले, त्यांना धर्माच्या नावावरून लक्ष्य केले. एवढी गंभीर भाषा वापरूनही भाजपाकडून त्यावर कारवाई केली नाही वा समजही देण्यात आली नाही याचे आश्चर्य वाटत नाही, कारण त्यांच्या पोटात होते तेच ओठावर आले पण लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी बिधुरींवर कठोर कारवाई केली पाहिजे. विरोधी पक्षांच्या सदस्यांबद्दल जी तत्परता अध्यक्ष दाखवतात तोच कणखरपणा त्यांनी आताही दाखवावा अशी मागणी नसीम खान यांनी केली आहे.