… हीच भाजपची महिलांसंदर्भात मानसिकता आहे का?
मुंबई, दि. २० सप्टेंबर ;
महिला विधेयकाला माझा पाठिंबा आहे पण मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा व्हावी, तसेच एसी, एसटी, ओबीसी महिलांना आरक्षण विधेयकात सहभागी करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे. महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, मी जेव्हा संसदेत निवडून आले. तेव्हा दोन महिला माझ्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. त्या म्हणजे वृंदा करात आणि सुषमा स्वराज. या विधेयकाचा सरकारला फायदा होईल की तोटा ते माहित नाही. पण हा या सरकारचा जुमला आहे. फार विचार करायची गरज नाही. कारण निवडणुकीच्या अनुषंगाने हे बिल मोदी सरकारने आणलं आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, या विधेयकाला माझा पाठिंबा आहे, परंतु या विधेयकात SC, ST, OBC ला सहभागी करून घ्यायला हवं. तुमच्याकडे सभागृहात 303 चं बहुमत आहे. तसंच, अनेक राज्यांमध्ये मोडतोड करून तुमचं सरकार आहे.तर त्यांनी एससी, एसटी, ओबीसी महिलांनाही लोकसभेत आणि विधानसभेत आरक्षण दिलं पाहिजे असं सुप्रियाताई सुळे म्हणाल्या. तसंच, मराठा आणि धनगर आरक्षणावरही संसदेत चर्चा व्हावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मी लोकप्रतिनिधी आहे, माझ्यासारख्या महिलांनी आरक्षण घेऊ नये या मताची मी आहे. मी कसं काय आरक्षण घेणार? कारण हे आरक्षण ज्या महिलांना संधी मिळत नाही त्यांच्यासाठी आहे. माझ्यासारख्या महिलांनी हेच काय कुठलंही आरक्षण मग ते मराठा असेल, ओबीसींचं असेल, धनगर, मुस्लिम असेल कुठलंही आरक्षण घेऊ नये. कारण ज्याला आरक्षण खरोखर गरजेचं आहे.त्याला त्याचा फायदा होईल. आम्हाला शिक्षण मिळालं आहे. आमच्या कुटुंबाने आम्हाला आमच्या पायावर उभं केलं आहे. त्यामुळे आम्ही आरक्षण घ्यायला नको. महिला आरक्षण अमलबजावणी झाली पाहिजे तेव्हा त्यावर बोलता येईल. असे देखील सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक महिलेला मताचा अधिकार दिला. महात्मा फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला. माझे वडील शरद पवार यांनी महाराष्ट्रात महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना आरक्षण दिले आहे. प्रमिला दंडवते यांनी सर्वप्रथम महिला आरक्षणाचे प्रायव्हेट बील आणले होते. माझ्या वडिलांनी शरद पवार आणि आई प्रतिभा पवार यांनी ठरवलं होतं की एकच मुलं होऊ द्यायचं मग ते मुलगा असो किंवा मुलगी. 50 वर्षांआधी हा निर्णय घेणं म्हणजे कौतुकास्पद आहे, असं म्हणत त्यांनी सांगितलं की ,माझ्या जन्मानंतर आईचं ऑपरेशन नाही तर बाबांनी ऑपरेशन करत फॅमिली प्लॅनिंग केलं होतं आणि याचा मला अभिमान आहे.
कुठलंही जबाबदारीचं पद हे कर्तृत्वावर ठरतं. महिला किंवा पुरुष अशा निकषांवर ते ठरत नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ती व्यक्ती व्हावी जी महाराष्ट्राची प्रगती करु शकेल. असंही सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे. सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे. अमित शाह म्हणाले होते की भाऊ बहिणीचं कल्याण करतो यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या की प्रत्येक घरात असे भाऊ नसतात जे बहिणीचे कल्याण करु शकतील असे देखील सुप्रिया सुळे यांनी म्हटले. भाजप नेत्याने मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला. भाजपकडून महिलांचा सतत अपमान करण्यात येतो. हीच भाजपची महिलांसंदर्भात मानसिकता आहे का? असेही सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे.