वांद्र्यात उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर..
मुंबई, दि. 19 सप्टेंबर ;
दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी उज्जैन येथील महाकालेश्वर मंदिराची ६० फुट उंच हुबेहुब प्रतिकृती साकारली आहे. त्यासोबतच मंदिर परिसरात हैद्राबाद येथून मागवण्यात आलेल्या दाक्षिणात्य पध्दतीच्या भव्य कमान आणि त्यावर दिव्यांची रोषणाई हेही यावर्षीचे आक्रर्षण ठरणार आहे.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार असलेल्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचे २८ वे वर्ष असून दरवर्षी एक प्रसिध्द मंदिराची आरास मंडळातर्फे केली जाते. गतवर्षी बद्रिनाथ मंदिराची आरास करण्यात आली होती तर त्याअगोरच्या वर्षी काठमांडू येथील पशुपती नाथ मंदिर साकारले होते. तर मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती. त्यापुर्वी शिर्डीचे साई मंदिर, पंढपरपूचे विठ्ठल मंदिर यासह महाराष्ट्र, गुजरात, गोव्यातील प्रसिध्द मंदिराची आरास करण्यात आली होती.
विविध जाती धर्मियांची वस्ती असलेल्या वांद्रे रेक्लमेशन येथे हा गणेशोत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्वधर्मिय सहभागी होतात. तसेच दरवर्षी चित्रपट, क्रिडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जुन येतात त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळामध्ये हे मंडळ लक्षवेधी ठरले आहे. मंडळाने कोरोना काळातही उत्सवाची परंपरा खंडित केली नाही. सातत्याने २७ वर्षे गणपती सोबतच एका प्रसिध्द देवस्थानाचे दर्शन या मंडळातर्फे भाविकांना घडविण्यात येत आहे.
यावर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिर साकारले आहे. उज्जैन हे ५ हजार वर्षे जुने प्राचीन आणि ऐतिहासिक शहर आहे. महाकाल स्वतः येथे वास्तव्य करतात. या शहरात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग, सात मुक्ती शहरांपैकी एक, गडकालिका आणि हरसिद्धी, दोन शक्तीपीठे आणि भारतातील चार शहरांमध्ये होणारे पवित्र कुंभ आहेत. अग्निपुराणानुसार उज्जैन नगरीला मोक्ष देणारी आहे. ही देवांची नगरी आहे. महान कवी कालिदास यांनी उज्जैनच्या सौंदर्याची स्तुती केली आहे आणि त्यांच्या मते उज्जैन हा स्वर्गाचा एक पतित भाग आहे. उज्जैनमध्ये तीन दिवसीय ‘शैव महोत्सवाचे’ आयोजन करण्यात येते. उत्सवादरम्यान सर्व १२ ज्योतिर्लिंगांचा प्रतीकात्मक मेळावाही होतो. सर्व १२ ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृतींसह भव्य मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात होते.
या स्थानाचे महत्व ओळखून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्जैन येथे भव्य व सौदर्यपूर्ण ‘महाकाल लोक’ कॉरिडॉर निर्माण केला असून, भक्तांसाठी अनेक सुविधा निर्माण केल्या आहेत. ‘श्री महाकाल’ हे भारताच्या सांस्कृतिक, आध्यात्मिक परंपरेची नवी ओळख ठरावी, यासाठी अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर श्री. महाकाल मंदिराची हुबेहूब प्रतिकृती मंडळातर्फे उभारण्यात आली आहे. त्यामुळे आपणही स्वतः उज्जैन येथे श्री. महाकालेश्वराच्या दर्शनाला गेल्याची अनुभूती मिळणार आहे. ही संकल्पना ज्यांची आहे असे मंडळाचे प्रमुख सल्लागार आमदार ॲड. आशिष शेलार यांनी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी गणेशभक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
मंडळातर्फे धार्मिकेतेसोबत अनेक वैद्यकीय व सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमही राबविण्यात येतात. त्याला गणेश भक्तांची साथ मोठ्या प्रमाणात मिळते, मुंबईतील नवाजलेल्या मंडळातील आमचे एक मंडळ असून आपल्या मनोकामना पुर्ण करणारा गणपती बाप्पा अशी या बाप्पाबद्दल भक्तांची धारणा असल्याने तसेच आमची भव्य मंदिराची आरास हे गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण असल्याने दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. याही वर्षी आम्ही भक्तंची गैरसोय न करता दर्शन व्यवस्था हाईल याचे नियोजन केल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली आहे.
दरवर्षी 31 डिसेंबरला आमदार अँड आशिष शेलार यांच्यातर्फे वांद्रे प्रोमोनाड येथे दिव्यांची रोषणाई केली जाते ती अवघ्या मुंबईचे खास आकर्षण ठरते. त्याच प्रमाणे यावर्षी गणेशोत्सवात ही वांद्रे पश्चिम लिलावती पासून गणेश मंडपापर्यंत हैद्राबाद येथून आणलेल्या दाक्षिणात्य पध्दतीच्या दिव्यांची खास रोषणाई करण्यात आली आहे. देव देवता आणि मंदिरे यांची भव्य प्रतिकृती रोषणाईत साकारण्यात आल्या आहेत.