नाशिक हे वैद्यकीय सुविधांचे हब बनावे..
नाशिक, दि. १८ सप्टेंबर :-
नाशिक शहराला हवामान अतिशय चांगले लाभल्याने याठिकाणी वैद्यकीय क्षेत्राच्या विकासाला अधिक वाव आहे. नाशिकमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथीसह सर्वच पॅथीमध्ये उपचार करण्याच्या दृष्टीने सुविधा विकसित केल्या जाऊ शकतात. भविष्यात वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी देशातील आणि जगभरातील लोकांना नाशिक हे एक महत्वाचे वैद्यकीय सुविधा मिळणारे केंद्र म्हणून विकसित होईल यासाठी आपले प्रयत्न कायम असतील असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
भुजबळ यांच्या हस्ते एस. आर. व्ही. समूहाच्या अत्याधुनिक सेवा सुविधा असलेल्या नवीन ‘एसआरव्ही राजेबहादूर हॉस्पिटल’चे आज उद्दघाटन आज झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंत्री छगन म्हणाले की, मंत्रभूमी म्हणून पुरातन ओळख असलेलं नाशिक यंत्रभूमि म्हणून नावारूपाला आलं. नाशिक आगामी उद्योगनगरी म्हणून नावारूपाला येत आहे. नाशिकमध्ये उद्योगांचा विकास करतांना नाशिकचं असलेल नाशिकपण टिकविणे हे जास्त महत्वाचे असल्याने येथील हवामान आणि पर्यावरणाला कुठलाही धोका निर्माण होणार नाही यादृष्टीने नाशिकचा विकास करण्यासाठी प्रयत्न असून नाशिकचं नाशिकपण टिकविण्यासाठी नाशिक हे शैक्षणिक, वैद्यकीय व पर्यटनाचं हब निर्माण करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिकमध्ये नुसतीच अॅटो इंडस्ट्रीज नाहीतर अॅग्रो बेस्ड अन्न प्रक्रिया उद्योग,आय टी उद्योग तसेच शैक्षणिक व मेडिकल टुरिझमचा उद्योग देखील स्थिरावण्यास सुरवात झाली असून नाशिकमध्ये नवनवीन उद्योग आणण्यासाठी आपला प्रयत्न आहे. तसेच नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करण्यात आले असून नाशिकमध्ये विद्यापीठाच्या आवारात शासकीय वैदकीय महाविद्यालय व पदव्युत्तर महाविद्यालय देशात रोल मॉडेल ठरेल अशा स्वरूपात विकसित करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक हा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील मुंबई-पुणे खालोखाल तिसरा मोठा जिल्हा आहे. त्यादृष्टीने उच्च गुणवत्तेचे वैद्यकीय शिक्षण आणि अत्याधुनिक आरोग्य सेवा देऊ शकेल असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठात विकसित करण्यात येत आहे. तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयुर्वेद, होमिओपॅथी आणि फ़िजिओ महविद्यालय देखील सुरु करण्यात मानस असून प्रस्तावित वैदयकीय महाविद्यालय व पदव्युत्तर पदवी महाविद्यालयाने नाशिकच्या विकासात अधिक भर पडणार आहे असे सांगत एस आरव्ही राजबहादुर हॉस्पिटल या नवीन रुग्णालयात अतिशय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवा उपलब्ध होतील असे त्यांनी यावेळी सांगितले.