शिंदे सरकारच्या माथी शेतकरी आत्महत्येचा ‘कलंक’…
मुंबई , दि. १० सप्टेंबर :-
राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्यांच्या संख्येवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे कितीही प्रयत्न केले तरी या सरकारच्या माथ्यावर लागलेला शेतकरी आत्महत्येचा हा ‘कलंक’ सरकारला पुसता येणार नाही असा हल्लाबोल त्यांनी सरकारवर केला आहे.
एका बातमीचा आधार घेत शेतकरी आत्महत्येबद्दल ट्विटरवर आपले मत व्यक्त करताना जयंत पाटील म्हणाले आहेत की, एकीकडे सभागृहात बोलताना मुख्यमंत्री राज्याला शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याची घोषणा करतात. दुसरीकडे मराठवाड्यात मात्र शेतकरी आत्महत्यांचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आठ महिन्यात तब्बल ८६५ शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केल्याची आकडेवारी धक्कादायक आहे.
दिवसाला सरासरी २ ते ३ शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे अशी माहिती त्यांनी दिली. कर्जबाजारीपणा, नापिकी, महागाईमुळे बिकट झालेली आर्थिक परिस्थिती, गेल्या वर्षी अतिवृष्टी, त्यानंतर आता दुष्काळाचे संकट या सगळ्यातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरले आहे अशी टीकाही त्यांनी केली.