जखमी गोविंदा सुरजला 5 लाखांची मदत..
मुंबई, दि. १० सप्टेंबर :
यंदा महाराष्ट्रासह मुंबई आणि उपनगर परिसरात मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. नुकत्याच झालेल्या या दहीहंडी महोत्सवात सूरज कदम नावाच्या तरुण गोविंदास गंभीर दुखापत झाली होती. केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
याबाबत माहिती मिळाल्यानंतर मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेटमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मंत्री लोढा यांनी रुग्णालयात जाऊन, सूरज कदमची विचारपूस केली व त्याच्या तब्येतीची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या.
सूरजचा उत्तम इलाज व्हावा यासाठी डॉक्टरांशी देखील चर्चा केली आहे. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सुरजला 5 लाख रुपयांची मदत, भाजपातर्फे करण्यात येणार असल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सूरजला व्यक्तिगत पातळीवर 1 लाखांची मदत देखील केली आहे. सूरज लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी त्यांनी योग्य त्या सूचना दिल्या आहेत.