नाना पटोलेंनी इरसाळवाडीच्या लोकांना दिला आधार !
मुंबई, दि. २० जुलै :
रायगड जिल्ह्यातील दरड कोसळलेल्या इरसाळवाडीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व स्थानिक लोकांशी संवाद साधून दुर्घटनेची माहिती घेतली. या घटनेतून सुखरूप वाचलेल्यांना नाना पटोले यांनी आधार दिला. सरकारने तातडीने लोकांचे पुनर्वसन करावे व त्यांना दररोज लागणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्तुंची मदत पोहचेल याची व्यवस्था करावी असे पटोले म्हणाले.
इरसाळवाडीतील घटना अत्यंत दुःखद आहे. वेळीच या लोकांना सुरक्षित स्थळी हलवले असते तर नाहक बळी गेले नसते पण सरकारने योग्यवेळी दखल घेतली नाही. मागील तीन चार दिवसापासून अतिवृष्टीचा इशारा दिला जात असताना धोकादायक, दरडप्रवण भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवले असते तर अनेक जीव वाचले असते. आतातरी सरकारने जलदगतीने हालचाली करुन लोकांना सर्व प्रकारची मदत मिळेल याची व्यवस्था करावी.