बापाच्या आणि आईच्या बाबतीत कोणी नाद करायचा नाय !

0
IMG-20230705-WA0112

बापाच्या आणि आईच्या बाबतीत कोणी नाद करायचा नाय !

मुंबई, दि. ५ जुले:

हा बाप माझ्या एकटीचा नाही, तर माझ्यापेक्षा पक्षातील सर्वांचा जास्त आहे. माझ्या बापाच्या आणि आईच्या बाबतीत कोणीही नाद करायचा नाही, असा थेट इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

मी महिला आहे, छोटसं बोललं तर डोळ्यात टचकन पाणी येतं, पण संघर्षाची वेळ येते तेव्हा पदर खोचून तीच महिला अहिल्या, तीच ताराराणी आणि तीच जिजाऊ होते. आता ही जबाबदारी आपल्या सर्वांवर आली आहे. ही लढाई एका व्यक्तीविरोधात नाही तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आपल्याला लढायची आहे, असे आवाहनही सुप्रियाताईं सुळे यांनी कार्यकर्त्यांना केले.

नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टीला काही लोक नॅचरली करप्ट पार्टी असे बोलत होते. पण ‘ना खाऊंगा ना खाने दुंगा, मुझे जरूरत पडेगी तो नॅचरली करप्ट पार्टी पुरा खा जाऊंगा’ असा टोलाही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी देशाच्या राज्यकर्त्यांना लगावतानाच या देशात सगळ्यात करप्ट पार्टी कोणती असेल तर ती भारतीय जनता पक्ष आहे, असा थेट आरोपही खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केला.

काही लोक म्हणतात की ज्यांचे वय झाले त्यांनी केवळ आशीर्वाद द्यावेत. पण वय हा केवळ आकडा आहे, लढण्याची जिद्द हवी, असे प्रत्युत्तर सुप्रियाताईं सुळे यांनी दिले. आपल्या वडिलांना घरी बसून आशीर्वाद देण्याची वक्तव्यं करणाऱ्यांपेक्षा आमच्यासारख्या मुली परवडल्या असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. या परिस्थितीत आपण हताश व्हायचे नाही. आपण पक्ष पुन्हा बांधू शकतो हा विश्वासही सुप्रियाताई सुळे यांनी व्यक्त केला. जे गेलेत त्यांना आपल्या शुभेच्छाही दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आश्वासक चेहरा कोण यावर कार्यकर्त्यांमधून शरद पवार असा एकच आवाज उठला. त्यावर सुप्रियाताई सुळे यांनी त्यांच्याही बॅनरवर शरद पवारसाहेबांचा फोटो आहे. यापुढे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या खोटारडेपणा विरोधात लढायचं आहे. भाजपने केवळ द्वेष पसरवला आहे. त्यांच्या विरोधात पूर्ण ताकदीने आपल्याला उतरायचे आहे असे आवाहन केले.

सत्ता येते आणि जाते, मात्र केवळ सत्तेतून सुख मिळत नाही. आपल्याकडे ज्या खुर्च्या रिकाम्या झाल्या आहेत त्यावर नवीन लोकांना बसण्याची संधी मिळेल. आपण नवीन उमेदीने कामाला लागूया, ज्यातून महाराष्ट्राची जनता याच योद्ध्यामागे उभी राहील. जे अनेकदा महाराष्ट्राने दाखवले आहे ते पुन्हा एकदा आपल्याला करायचे आहे. ज्यातून ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा आणि चिन्हं आपल्याकडे राहील. आपल्या पक्षाचा एकच शिक्का आहे ज्याचे नाव हे शरद पवार आहे, अशा शब्दात सुप्रियाताईं सुळे यांनी कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *