‘उषःकाल होता होता काळरात्र झाली….!
‘उषःकाल होता होता काळरात्र झाली….!
मुंबई दि. ५ जुलै –
शिवसेनेचे हिंदूत्व आहे ते लपवून ठेवत नाही ते हिंदूत्व अठरापगड जातींच्या लोकांना घेऊन जाणारे आहे. तर भाजपचे हिंदूत्व आहे ते विभाजनवादी, विषारी, मनुवादी आणि विघातक आहे. माणसामाणसामध्ये वितंडवाद वाढवणार… विद्वेष वाढवणारं आहे अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत केला.
राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे मोठ्या गर्दीत पार पडली. यावेळी शरद पवार यांनी येणाऱ्या संकटाना सामोरे जाताना ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’ अशी हाक दिली.
आज चर्चा आहे कुणासोबत किती आमदार आहेत याची. आमदार आणता येतात. गेले त्यांची चिंता करू नका ते सुखाने राहू देत. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपण सामुहिक शक्तीतून नक्की नव्याने कर्तृत्ववान अशा लोकांची पिढी, नेतृत्वाची पिढी महाराष्ट्रात निर्माण करु असा आत्मविश्वास शरद पवार यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला.
आजची बैठक ऐतिहासिक आहे संबंध देशाचे लक्ष लागले आहे तशी चर्चाही या बैठकीची सुरू आहे. २४ वर्षापूर्वी मुंबईत तुमच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा जन्म झाला. शिवाजी पार्कवर या पक्षाची स्थापना केली. २४ वर्षे झाली यामध्ये आम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेतृत्वाची फळी उभी करण्यात राष्ट्रवादीला यश आले. अनेक कार्यकर्ते आमदार, मंत्री, खासदार झाले. सामान्य कुटुंबातील कार्यकर्ता राज्य कसं चालवू शकतो हे राष्ट्रवादीमुळे देशाला समजले. अनेक नवीन नेते तयार केले. आज आपल्याला आणखी पुढे जायचे आहे. संकटे खूप आहेत.ती संकट ज्याची वैचारिक भूमिका देशाच्या हिताची नाही अशांच्या हातामधे देशाची सूत्रे आहेत. ज्यांच्या हातामध्ये सुत्रे आहेत त्यांच्यापुढे त्यांच्या सहकाऱ्यांनासुध्दा त्यांना म्हणावी तशी कल्पना मांडण्यासंदर्भात मर्यादा आहेत असेही शरद पवार म्हणाले.
राष्ट्रवादी इतका भ्रष्ट आहे असे वाटत असेल तर शपथविधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला का बरोबर घेतले. तुमच्या मंत्रीमंडळात कसे काय? याचा अर्थ असा आहे आधार नसलेल्या गोष्टी बोलत आहेत. जनमाणसामध्ये एकप्रकारे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत.
आज काही लोकांनी बाजुला जाण्याची भूमिका घेतली, माझी काही तक्रार नाही,मला त्याचे दु:ख आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घाम गाळून विधीमंडळात आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांना चांगले दिवस आणले. त्यांना विश्वासात न घेता, पक्षाला विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली हे योग्य नाही. चुकीच्या विचारांच्या बाजूला जाऊन बसण्याची वेळ आली हे चांगले नाही.
चिन्ह घेऊन जाणार असाल तर कुठलंही चिन्ह असेल. जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतःकरणात पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्यांची भूमिका खोल आहे तोपर्यंत काही चिंता करण्याचे कारण नाही असा विश्वासही शरद पवार यांनी दिला.
आज माझ्यावर काही लोक बोलले. त्यांनी बोलताना मी त्यांचा गुरु आहे. आज मुंबईभर माझे फोटो लावले आहे. त्यांना माहीत आहे आपलं नाणं चालणार नाही जे नाणं घ्यायचे ते नाणं चालणारं पाहिजे कारण त्यांचे नाणं खरं नाहीय ते खणकन वाजणार नाही. हे लोक ओळखतील त्यामुळे नको ती अडचण म्हणून फोटो लावत आहेत असेही शरद पवार म्हणाले.
अनेकांनी भाषणे केली. राज्यात पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं कुणी थांबवू शकत नाही. त्याला पंढरपूरला जावं लागतं असं नाही कानाकोपऱ्यातील लोक वारीमध्ये जातात त्यांच्या अंतःकरणात एकच भावना असते पांडुरंगाचे दर्शन घ्यायचे, पंढरीला पोचल्यानंतर मंदिरातसुध्दा जाता येत नाही बाहेरुन नवस करतात आणि आनंदाने परत जातात. त्यामुळे ती अवस्था आपल्या सगळ्यांसमोर आहे. त्यामुळे पांडुरंग म्हणायचं, गुरु मानायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष झालं म्हणायचं…ही गमतीशीर गोष्ट आहे असेही शरद पवार म्हणाले.
‘उषःकाल होता होता काळरात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली…’ या दोन ओळी बोलून शरद पवार यांनी सभेची सांगता केली.
