महाराष्ट्रात राजकीय भूकंप,अजितदादा ईडी सरकारमध्ये !
महाराष्ट्रात राजकीय भूकंप,अजितदादा ईडी सरकारमध्ये !
मुंबई, दि. २ जुलै;
महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा भूकंप झाला आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपाबरोबर सत्तेत सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही सहकाऱ्यांना बरोबर घेऊन भाजपा-शिंदे सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. शिवसेनेतील बंडानंतर राज्याच्या राजकारणात हे दुसरे मोठे बंड ठरले आहे.
अजित पवार यांच्याबरोबर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे यांच्यासह ९ जणांनी राजभवन येथे मंत्रीपदाची शपथ घेतली.
“२०२४ ची निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात लढवणार आहे. आम्ही शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपसोबत का नाही ? यापुढील सर्व निवडणुका घड्याळ या चिन्हावर लढणार आहे. राज्याचे हित पाहून वरिष्ठांची चर्चा करुनच घेतला आहे. शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदारांनी सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तशी आम्ही शपथ घेतली, विस्तार होणार आहे. इतर सहकारी मित्रांना संधी देण्याचा प्रयत्न असेल. यासंदर्भात अनेक चर्चा सुरु होतील. वरीष्ठ पातळीवर चर्चा होत होती. सर्वांचा विचार करत विकासाला महत्त्वं दिले पाहिजे. मागील ९ वर्षात कारभार चालला आहे तसा चांगला प्रयत्न मोदी साहेब करतायत. त्या भूमिकेला आपण पाठिंबा दिला पाहिजे. विरोधी पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करतात. अनेक ठिकाणी वेगवेगळे प्रश्न आहेत. विरोधी पक्षातून आऊटपूट काही निघत नाही” असे अजित पवार म्हटले आहे.
एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी ४० आमदारांना सोबत घेत बंड केले होते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात खळबळ माजवली होती. शिंदे सरकारच्या बंडाला वर्ष होताच अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना सोबत घेत बंड केले आहे.
