…. तर भाजप राज्यातील मंदिरे उघडेल!
विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचा इशारा.
मुंबई दि.२९ ऑगस्ट :
दोन दिवसात मंदिरे उघडली नाही तर भारतीय जनता पार्टीकडून राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात येतील. सरकार झोपले आहे, त्याला जागे करण्यासाठीच हा घंटानाद राज्यभर केला जात आहे, असा इशारा विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सरकारला दिला आहे. मागाठाणेतील अशोकवन परिसरात हनुमान मंदिरात झालेल्या घंटानाद आंदोलनाच्या वेळी त्यांनी हा इशारा दिला.
केंद्राने संपूर्ण देशभर मंदिर, मशिद, चर्च अशी सर्व प्रार्थनास्थळे सुरु करायला परवानगी दिली आणि ती सुरूही आहेत. पण हे राज्य सरकार पूर्णपणे आपल्या धर्माच्या, हिंदुत्वाच्या किंवा या सर्व प्रक्रियेच्या विरोधात आहे असे दिसते. एकीकडे दारूची दुकाने सुरु होत आहेत, मॉल सुरु होत आहेत परंतु आमची श्रद्धास्थान असलेली आमची दैवतं, त्यांची मंदिरे सुरु होत नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. म्हणून सरकारला जागे करण्यासाठी भाजपाने राज्यभर घंटानाद आंदोलन सुरु केले आहे, अशी माहिती दरेकर यांनी यावेळी दिली.
“उध्दवा दार उघड, आता तरी जागा हो, अशी भूमिका हिंदुत्ववादी संघटनांनी देशभर, राज्यभर घेतली आहे,” असे सांगून त्यांनी,’ अशोकवन येथील हनुमान मंदिर समोर घंटानाद करून सरकारच्या कानटीळ बसविण्याचा प्रयत्न केला. “सरकारचे कान उघडे असतील तर हा आवाज त्यांच्यापर्यँत पोहचेल. आणि मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतील. पण जर दोन तीन दिवसात मंदिरे उघडली नाहीत तर भारतीय जनता पार्टी स्वतः मंदिरे उघडी करेल. सोशल डिस्टंशिंगची जी काळजी घायची आहे त्याबाबत मंदिरांना सूचना देऊ, भक्तगण काळजी घेतील,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.
या घंटानाद आंदोलनात माजी नरसेवक प्रकाश दरेकर, अॅड शिवाजी चौगुले, मोतीभाई देसाई, गौतम पंडागळे, मंडळ अध्यक्ष दिलीप उपाध्याय, माधुरी रावराणे, प्रियांका रेडकर, अध्यक्ष लकी यादव, अमोल खरात, आबा जाधव, सचिन शिरवडकर, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष अमर शाह, युवामोर्चा मंडळ अध्यक्ष अमित उतेकर आदी सहभागी झाले होते.
