राहुल गांधींविरोधात मुंबई भाजपाचे आंदोलन !
राहुल गांधींविरोधात मुंबई भाजपाचे आंदोलन !
मुंबई, दि. २७ मार्च ;
‘राहुल गांधी हाय हाय ‘… ‘राहुल गांधी माफी मांगो…’, ‘ देशविरोधी वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींचा निषेध असो’ अश्या घोषणा देत स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर आणि ‘मोदी’ आडनावावरून ओबीसी समाजाचा अपमान करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा तीव्र निषेध करण्यात आला. मुंबई भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात तीव्र निदर्शने करण्यात आली. लालबाग येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटन मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. संतप्त कार्यकर्त्यांकडून पोस्टर जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी राहुल गांधींविरोधात जोरदार नारेबाजी करत त्यांनी ओबीसी समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली आहे.
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भारत जोडो यात्रेत वारंवार अपमान केला आहे. राहुल गांधी यांच्या मोदी आडनावावरून केलेल्या वक्तव्यामुळे ओबीसी समाज त्यांना धडा शिकवणार आहे. काँग्रेसकडून ज्या प्रकारे जातीयवाद रुजवला गेला आहे, तो जातीयवाद भाजपकडून ठेचून काढणार असल्याचा इशारा चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी दिला. ओबीसी समाजावरील वक्तव्यामुळं राहुल गांधी यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेतृत्वाविषयी अवमानकारक बोलणं आम्ही कदापि सहन करणार नाही असेही ते म्हणाले.
न्यायालयाने राहुल गांधींना दोषी ठरवत शिक्षा सुनावली आहे. मात्र ही शिक्षा मान्य करण्याऐवजी काँग्रेस नेते रस्त्यावर आंदोलन करून न्यायालयाचा व संविधानाचा अपमान करत असल्याचा आरोप पर्यटन मंत्री ॲड. मंगलप्रभात लोढा यांनी यावेळी केला.
