तुम्हीच मला दत्तक घ्या, तुमच्या साथीने मतदारसंघ पुन्हा नव्याने बांधू !
परळी, दिनांक ०४ मार्च :
गोपीनाथ मुंडे यांनी इथल्या लोकांसाठी चाळीस वर्षे खस्ता खाल्ल्या, त्यांना जावून आज नऊ वर्षे झाली पण आजही परळी त्यांच्याच नावानं ओळखली जाते कारण त्यांनी इथल्या लोकांचा सन्मान वाढवण्याचं काम केलं, अगदी तसंच काम माझ्या हातून होईल. माझ्या परळीची मान मी कधीही खाली जावू देणार नाही असं सांगत आता तुम्हीच मला दत्तक घ्या, तुमच्या साथीने मतदारसंघ पुन्हा नव्याने बांधू अशी साद भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी जनतेला घातली.
सत्ता हातात असताना ज्यांना गावच्या विकासाची एक वीटही लावता आली नाही ते आता भाजपच्या सत्तेत आम्ही मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी मात्र पुढे येत आहेत. जनतेच्या विकासाला आणि सुख-शांतीला नख लावण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही अशा आक्रमक शब्दांत त्यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
लोणी व कौठळी येथे सहा कोटी रूपये खर्चाच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे भूमिपूजन पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज ग्रामस्थांच्या साक्षीने मोठया थाटात झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या.
मतदारसंघातील प्रत्येक गांव विकासानं परिपूर्ण व्हावं हे मुंडे साहेबांचं स्वप्न होतं. पालकमंत्री असताना त्यासाठी मी अथक प्रयत्न केले. निधी देतांना हात आखडता घेतला नाही की कोणताही पक्ष, जात, धर्म पाहिला नाही, सर्वाना न मागता दिलं तथापि, कुणाकडून अपेक्षाही ठेवली नाही. एवढी कामं केली पण कधी श्रेय घेतलं नाही, हे मात्र माझं चुकलं. देशात आणि राज्यातही भाजपचं सरकार असताना विरोधक मात्र हे सर्व आम्हीच केलं असल्याचा फुकटचा आव आणत आहेत. अडीच तीन वर्षे सत्ता होती, त्यांनी एक तरी काम केलं का? असा सवाल त्यांनी केला. दोन्ही पाणी योजनांचं काम दर्जेदार झालं पाहिजे. लोकांना पाणी देण्यासाठी आपण आहोत, परळीच्या नगरपरिषदे सारखे फक्त खड्डे खोदू नका असं त्यांनी सांगितलं.