• Sat. Mar 15th, 2025 2:30:47 AM

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 213 Today: 1 Total: 4119726

मोदी ज्या प्रकल्पांचे उद्घाटन करणार त्यात ईडी सरकारचे योगदान काय ?

मुंबई, दि. १८ जानेवारी:

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या प्रकल्पांचे उदघाटन करणार आहेत, त्यात शिंदे फडणवीस सरकारचे कोणतेही योगदान नाही आहे. या आधीच्या सरकारच्या काळात हे सर्व प्रकल्प मार्गी लागले आहेत व योजना आखल्या गेलेल्या आहेत पण पंतप्रधानांच्या हस्ते या प्रकल्पांचे उदघाटन करून, हे सर्व शिंदे-फडणवीस सरकारनेच केले, अशी दिशाभूल केली जात आहे असे आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी म्हटले आहे.

मुंबईतील ज्या ४०० किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाचे पंतप्रधान उदघाटन करणार आहेत. त्यात देखील मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे. फक्त जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठी कोणत्याही नियोजनाअभावी रस्ते काँक्रीटीकरण प्रकल्पाचे पंतप्रधानांच्या हस्ते घाईगडबडीत उदघाटन केले जात आहे. तसेच ६००० कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी महानगरपालिकेकडून उपलब्ध केल्याचे सांगितले जात आहे. महापालिकेवर कुणाचीही सत्ता नसताना एक प्रशासक एवढ्या मोठ्या निधीला मंजुरी कशी देऊ शकतो? यामध्ये असा प्रश्न प्रीती शर्मा मेनन यांनी उपस्थित केला.

शिंदे फडणवीस सरकाराने शपथ ग्रहण केल्यापासून महाराष्ट्रामध्ये कोणतेही काम केलेले नाही. एक सरकार म्हणून शिंदे फडणवीस सरकार पूर्णपणे अपयशी ठरलेले आहे. अशा परिस्थितीमधे जर राज्यात आणि मुंबईत निवडणुका झाल्या तर आपला पराभव निश्चित आहे, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. म्हणून त्यांनी आगामी निवडणुका थांबवून ठेवल्या आहेत. यावर्षी जवळपास ७,५०० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि ते जिंकणार नाहीत म्हणून आपले अपयश लपविण्यासाठी आणि जनतेच्या डोळ्यांत धूळफेक करण्यासाठीच शिंदे-फडणवीस सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुंबईमध्ये बोलावण्याचा घाट घातला आहे. नरेंद्र मोदींच्या खोट्या प्रसिद्धीचा फायदा शिंदे फडणवीस सरकारला आगामी निवडणुकांमध्ये व्हावा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यासाठी मुंबईतील मेट्रो सेवा बंद ठेवली जाणार आहे. तसेच उदघाटन स्थळी जाणारे सर्व रस्ते व वांद्रे सांताक्रूझ विभागातील सर्व रस्ते दुपारी १२ ते रात्री उशिरापर्यंत सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत. त्यासाठी नोटिसा देखील पाठविण्यात आलेल्या आहेत. माझा शिंदे फडणवीस सरकार व स्थानिक पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे की, पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्याचा त्रास सर्वसामान्य मुंबईकरांना का ? पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी सर्वसामान्य मुंबईकरांना वेठीस का धरले जात आहे? मुंबईकर जनतेचा पंतप्रधानांना काय त्रास आहे? हा सर्वसामान्य मुंबईकर जनतेवर अन्याय आहे आणि याचा जितका निषेध करावा, तितका थोडा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *