मुंबईच्या सभेत पंतप्रधानांनी महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्यांवर बोलावे !
मुंबई, दि. १८ जानेवारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी शिंदे-फडणवीस सरकारकडून सरकारी पैशांतून जाहिरातबाजी केली जात आहे, ही जनतेच्या पैशांची लूट आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होऊन ६ वर्षे झाली, त्याचे काय झाले? यावर मोदींनी बोलावे तसेच महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या या विषयांवरही पंतप्रधान मोदींनी बोलावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
मोदींच्या मुंबई दौऱ्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, जी २० परिषदेसाठी मुंबई विमानतळाच्या परिसरात पडदे लावून मुंबईचे ‘खरे दर्शन’ होऊ नये याचा प्रयत्न केला होता. त्या कापड्यावर मोदींचे फोटो लावून ठेवले होते. आताही मोदींच्या मुंबईतील कार्यक्रमासाठी मोठी जाहिरातबाजी करण्यात आली आहे. देशात अनेक ज्वलंत प्रश्न आहेत पण पंतप्रधान मोदी त्यावर बोलत नाहीत. राज्यात वर्षभरात जवळपास तीन हजार शेतकऱ्यांनी आतमहत्या केल्या आहेत, त्यावर पंतप्रधान मोदी यांनी बोलावे. महागाईने जनतेचे जगणे मुश्कील झाले आहे, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे या प्रश्नावरही पंतप्रधानांनी बोलले पाहिजे. भाजपा सरकार अन्नदात्याची गळचेपी करण्याचे काम करत आहे त्यावरही त्यांनी बोलावे. मोदींच्या मुंबई दौऱ्यासाठी सरकारी पैशातून अनेक वर्तमानपत्रात पानभर जाहिराती देऊन वारेमाप प्रसिद्धी केली आहे.
भारतीय जनता पक्ष हिंदू-मुस्लीम विषयावर राजकारण करत आहे परंतु भाजपाला पराभव दिसू लागल्याने आता त्यांना मुस्लीम समाजाची आठवण झाली आहे. भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लीम समाजाबरोबर संवाद वाढवण्याचे आवाहन भाजपा कार्यकर्त्यांना केले आहे. मुस्लीम समाजाबद्दल मोदी किंवा भाजपाला प्रेम नाही. भारतीय जनता पक्षाचा कोणताही धर्म नाही, केवळ सत्ता हाच त्यांचा धर्म आहे आणि ‘मोदी है तो मुमकीन है’, असा टोलाही पटोले यांनी लगावला.