गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सट्टी !
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात सट्टी !
मुंबई, दि. 23 नोव्हेंबर
सरकारने काय करावं हा सरकारचा निर्णय आहे परंतु शेजारच्या राज्यात निवडणूका आहेत म्हणून आपल्या राज्यातील ठराविक जिल्हयात पगारी सुट्टी जाहीर केली आहे हे पहिल्यांदाच पहायला मिळाले. दर पाच वर्षांनी निवडणूका येतात परंतु मला कधी आठवत नाही. आम्ही सरकारमध्ये काम करत असताना शेजारच्या राज्यात निवडणूका लागल्या तर सुट्टी दिली आहे. हा आपण संसदेची निवडणूक समजू शकतो. पण असे आदेश पहिल्यांदा काढले हे पहायला मिळत आहे. वास्तविक असे नवीन पांयडे पाडणे चुकीचे आहे असे स्पष्ट मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केले.
मुळात ३६५ दिवसात जवळपास सर्वच प्रकारच्या पगारी, आजारी सुट्टया असतात त्या जवळपास पावणेदोनशे सुट्टया आहेत. ५२ आठवडे ५२ आणि ५२ झाले एकशे चार शिवाय सण, महापुरुषांच्या जयंत्या यामध्ये गांभीर्याने विचार केला पाहिजे. राज्याचा गाढा हाकताना इथे काम करणारा अधिकारी, कर्मचारी हा जर सहा महिने पगारी सुट्टी घेत असेल आणि सहाच महिने काम करत असेल तर हा जनतेचा टॅक्स रुपाने आलेला पैसा आहे. मी अर्थमंत्री असताना त्याबद्दल ज्यावेळी ही गोष्ट लक्षात आली त्यावेळी चर्चा केली होती की यामध्ये काहीतरी आपल्याला थोडासा बदल करण्याची गरज आहे परंतु बदल करत असताना संघटना, कामगार नेते यांना विश्वासात घेऊन मार्ग काढला पाहिजे परंतु त्याचवेळी जनतेलाही कळले पाहिजे की, यांना ३६५ दिवसात किती दिवस सुट्टया मिळतात असे माझे मत होते त्यात लक्षही घातले होते मात्र तोपर्यंत आमचे सरकार गेले याबाबत अजित पवार यांनी खंत व्यक्त केली.
एकनाथ शिंदे व फडणवीस सरकार आल्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यांची वेगवेगळी वक्तव्य येत आहे. त्यामध्ये जी वक्तव्ये अजिबात करण्याची गरज नाही. तरीही अशाप्रकारची वक्तव्य करुन समाजामध्ये तेढ निर्माण केली जाते आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून वाचाळवीरांना आवरा सांगितले होते. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. ही महाराष्ट्राची परंपरा नाही. इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टिका टिपण्णी होत नव्हती. अशापध्दतीचे महाराष्ट्राने ऐकले नाही किंवा खपवूनही घेतले नाही. आता तर वरीष्ठ पदावर बसणारी महत्त्वाच्या व्यक्तींना तारतम्य राहिलेले नाही. सत्ताधारी पक्षाचे प्रवक्त्यांना बोलण्याचे तारतम्य राहिलेले नाही. बोलून पण चूक झाली नाही माझ्या वाक्याचा वेगळा अर्थ काढला म्हणजे एखाद्याने चुकल्यावर दिलगिरी व्यक्त करतो आणि विषय संपवतो. परंतु तशापध्दतीचे होताना दिसत नाही. काहींनी तर कहरच केला आहे. कुणाबद्दल काय बोलतो याचे तारतम्य राहिलेले नाही. वास्तविक बोलताना तारतम्य आमच्यासहीत सर्व लोकांनी ठेवले पाहिजे. मी सत्ताधारी पक्षाला बोलतो असे नाही आम्ही विरोधी पक्षांच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी, कार्यकर्त्यांनी कायदा, नियम, संविधान या सगळ्या गोष्टी काय सांगतात याचा अभ्यास केला पाहिजे, लक्ष दिले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका व्यक्त केली.
ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने महामहिम राज्यपाल महोदयांना विचारांमधील अंधार दूर होऊ दे त्यांच्या वक्तव्यामधील गोंधळ संपू दे… राज्याच्या राज्यपालांना सद्बुद्धी लाभू दे अशी प्रार्थना सगळ्यांच्या साक्षीने अजित पवार यांनी आज केली.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे काही वक्तव्य आपण सगळयांनी बघितले ते महाराष्ट्रातील, देशातील कुणालाही चीड येईल अशाप्रकारचे वक्तव्य होते. या वक्तव्यावर लगेच ट्वीट केले होते. आजदेखील या वक्तव्याचा अजित पवार यांनी निषेध व्यक्त केला.
राज्यपाल वारंवार असे का बोलतात… का वागतात आणि सत्ताधारी यांच्याबद्दल का गप्प बसतात हे एक महाराष्ट्राला पडलेले कोडं आहे. मी राज्यपालांना विरोधी पक्षनेता म्हणून जाऊन भेटू शकतो. मी उपमुख्यमंत्री असताना भेटायला जायचो मला बर्याचदा राज्यपाल म्हणायचे अजितजी मुझे अभी बस.. मुझे अभी यहा नही रहना है… जाना है… हे खोटं नाही खरं आहे… मी त्यांना वरीष्ठांना सांगा असे सांगितले होते. त्यांना जाण्याकरता वरीष्ठ परवानगी देत नाही म्हणून ते अशी वक्तव्य केल्यानंतर तरी वरीष्ठ इथून आपल्याला पाठवतील जसं आम्ही अधिकार्यांना कुठे टाकले आणि त्यात त्याला बदली हवी असेल तर वेडंवाकडं काम करतो की त्याची बदलीच होते. तसे काही राज्यपालांच्या मनात आहे का अशा प्रकारची शंका घ्यायला जागा निर्माण होते असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी लगावला.
