• Mon. Jan 20th, 2025

Xtralarge News

आपल्या माणसांचा आवाज

Visits: 497 Today: 1 Total: 4007844

काँग्रेसला शिव्या दिल्याशिवाय भाजपाचा दिवसच जात नाही..

नांदेड, दि. 10 नोव्हेंबर :

देशात आज द्वेषाचे बिज पेरले जात आहे. समाजा-समाजात, जाती धर्मामध्ये भांडणे लावली जात आहेत. महात्मा गांधी, पंडित नेहरू जवाहरलाल नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद या सर्वांनी विविधतेत एकता हीच देशाची खरी ओळख सांगितली व जपली. देशातला तरुण नोकरीसाठी भटकत आहे पण मोदी सरकार त्यांना नोक-या देत नाही. देशात 30 लाख सरकारी जागा रिक्त आहेत पण नियुक्ती पत्र केवळ 75 हजार लोकांनाच दिली, कुठे गेले दरवर्षी 2 कोटी रोजगार ? असा हल्लाबोल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.


आज देश तोडण्याचे काम सुरू असताना राहुल गांधी मात्र देश जोडण्यासाठी निघाले आहेत. काँग्रेसला शिव्या दिल्याशिवाय भाजपाचा दिवसच जात नाही. सकाळ झाली की त्यांचा दिवस शिव्यानेच सुरू होतो. तुम्हाला शिव्या देणारे हवे आहेत का देशाची सेवा करणारे हवे आहेत ? असा सवाल त्यांनी विचारला.

यावेळी नाना पटोले म्हणाले की, ही पदयात्रा फक्त काँग्रेस पक्षाची नसून देश जोडण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाची आहे. देशासाठी लढणारा गांधी परिवार आहे. या कुटुंबाने देशासाठी दोन बलिदान दिली आहेत. राहुल गांधी या पदयात्रेच्या माध्यमातून तरुणांना नवा संदेश दिला आहेत. पहाटे उठून ते चालत आहेत, यातून एक सुदृढ भारत निर्माण होईल. शेतकरी, सामान्य जनतेचे प्रश्न घेऊन राहुल गांधी देशभर पदयात्रा करत आहेत.

विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, आज एका अभूतपूर्व घटनेचे आपण साक्षीदार झालो आहोत. राहुल गांधींच्या पदयात्रेला जनता उत्स्फूर्त पाठिंबा देत आहे. ते एकतेचा संदेश घेऊन निघाले आहेत. महात्मा गांधींच्या दांडी यात्रेवरही टीका केली  होती पण देश त्यांच्या पाठीमागे उभा राहिला व क्रांती घडली. भारत जोडो यात्राही क्रांती घडवेल. या पदयात्रेने देशात सकारात्मक ऊर्जा निर्माण होत आहे. स्वातंत्र्याची ही दुसरी लढाई आहे. देशाचा इतिहास लिहिताना राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रा सुवर्ण अक्षरांनी लिहीली जाईल.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी म्हणाले की, महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अशिर्वाद घेऊन राहुल गांधी पुढे निघाले आहेत. जनतेच्या समस्या ते ऐकून घेत आहेत. नांदेडमध्ये रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. सर्व समाज घटकांच्या लोकांनी राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला. आव्हानांना न डगमगता थेट भिडणारे नेते राहुल गांधी आहेत. देशातील आजची राजकीय परिस्थिती गंभीर आहेत, गलिच्छ राजकारण सुरू असून राजकीय स्तर खालावला आहे. विरोधकांचे गळे कापण्याचे काम केले जात आहे. देशात एकोप्याचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. देशात लोकशाही टिकली पाहिजे यासाठीच भारत जोडो यात्रा निघाली आहे. देशात अनेक समस्या आहेत, महागाई, बेरोजगारी प्रचंड मोठी समस्या आहेत. सामान्य जनता भरडली जात आहे पण त्याकडे केंद्र सरकार लक्ष देत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, या देशात वर्षानुवर्षापासून विविध जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने रहात आहेत, गंगा जमुना तहजीब देशात होती पण 2014 पासून चित्र बदलले असून गंगा जमुना तहजीबला नख लावण्याचे काम सुरू झाले आहे. महाराष्ट्राला थोर समाजसुधारक व महापुरुषांची मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्राला एक विचार आहे, संस्कृती आहे. 2014 नंतर नवा भारत उदयास आला आहे. मुलींनी कोणते कपडे घालावेत हे रस्त्यावरचे मवाली ठरवू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आलो आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *