…. तर उदयपूर घोषणापत्राची अंमलबजावणी करेन
…. तर उदयपूर घोषणापत्राची अंमलबजावणी करेन
मुंबई, दि. ८ ऑक्टोबर
काँग्रेसची विचारधारा हीच देशाला तारणारी असून ही विचारधार पुढे घेऊन जाण्याचे काम आपणास करावयाचे आहे. काँग्रेसची सेवा करण्यासाठी मी अध्यक्षपदाचा उमेदवार झालो आहे. मी पक्षाचा अध्यक्ष झालो तर शेतकरी, तरुण, महिला, एससी, एसटी समाज घटकांचे प्रश्न, छोटे व्यापारी यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेन. तसेच उदयपूर घोषणापत्राची अंमलबजावणी करेन, असे काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार खा. मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटले आहे.
मल्लिकार्जून खरगे यांनी मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयात प्रदेश प्रतिनिधींशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, ही लढाई व्यक्तीगत नाही, आपण आपसात लढायचे नाही तर आपली लढाई भारजीय जजता पक्ष, राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या विरोधात आहे. महागाई, रुपयाची घसरण, पेट्रोल, डिझेल, गॅसची दरवाढ, महिला अत्याचार, बेरोजगारी याविरोधात आपली लढाई आहे. माझा सामुहिक नेतृत्वावर विश्वास आहे, आपण सर्वजण मिळून एक विचाराने काम करू. महाराष्ट्र, मुंबईत जो बदल होतो तो देशभर पसरतो, मुंबईत भारत देश वसलेला आहे..
काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही आहे. अशी लोकशाही भाजपासह इतर पक्षात नाही. या पक्षात तुमच्या कामाची दखल घेतली जाते. मी पाच दशकापासून राजकीय क्षेत्रात आहे. कर्नाटकातील एका सामान्य कुटुंबातून आलो.. ब्लॉक स्तरापासून मी कामाला सुरुवात केली, वंतर कामगार संघटना बांधली व अध्यक्ष झालो. इंदिरा गांधी यांच्या १० कलमी कार्यक्रमाने मी प्रभावित झालो. काँग्रेस पक्षात फूट पडली त्यावेळी इंदिरा गांधी यांना कर्नाटकात कोणीही साथ देण्यास पुढे येत नव्हते, तेव्हा आम्ही त्यांच्यापाठीशी उभे राहिलो. काँग्रेस पक्षाने आमदार, खासदार, मंत्रीपद दिले, असे खर्गे म्हणाले.
