फॉक्सकॉन प्रकरणी ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या !
फॉक्सकॉन प्रकरणी ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊ द्या !
मुंबई, दि. २० सप्टेंबर
उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारचा राज्यात मोठमोठे प्रकल्प यावेत असा प्रयत्न सुरू होता. मात्र काही पक्षातील लोक वेगळया मागण्या किंवा डिमांड केली होती म्हणून फॉक्सकॉनचा प्रकल्प गेला असे स्टेटमेंट करत आहेत. मी उपमुख्यमंत्री असताना असं अजिबात झालेले नाही. कारण नसताना संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जर कुणाला तसे वाटत असेल तर केंद्र सरकार, राज्य सरकार, एजन्सी तुमच्या हातात आहेत, चौकशी करावी पण स्टेटमेंट करुन बेरोजगारांमध्ये गैरसमज निर्माण करु नये. वास्तविक असं काही घडलेले नाही तरीपण चौकशी करायची असेल तर जरुर करा ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊद्या असे थेट आव्हानच विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शिंदे सरकारला दिले.
वेदांतासारख्या प्रकल्पातून राज्यात गुंतवणूक येत असताना राष्ट्रवादी या चांगल्या कामाला नक्कीच पाठिंबा देईल. वेदांताचा जो फॉक्सकॉन प्रकल्प होता त्याबद्दल चर्चा बरीच झाली. आता मुख्यमंत्री दिल्लीत जाणार आहेत. त्यांनी याचा पाठपुरावा करावा तो त्यांचा अधिकार आहे. बेरोजगारांमध्ये असलेली नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी सर्वस्व पणाला लावावे.
काही जण अफवा पसरवत आहेत. चुकीच्या बातम्या देण्याचा प्रयत्न करत आहेत की, वेदांताला नाकारलं हे साफ खोटं आहे, चुकीचं आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. काहीजण बोलत आहेत की, अजून प्रकल्प आणणार आहे तर पुन्हा महाराष्ट्राला सांगतो महाराष्ट्राच्या हिताचे जे – जे प्रकल्प असतील ते – ते प्रकल्प महाराष्ट्रामध्ये यावेत फक्त त्यातून पर्यावरणाचा ऱ्हास होता कामा नये ही बाब सरकारने लक्षात ठेवावी आणि त्याची नोंद घेतली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.
देशात व महाराष्ट्रात महागाईचे, बेरोजगारीचे, कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत त्यांना व्यवस्थितपणे बाजूला ठेवून तिसरेच प्रश्न पुढे आणले जातात. देशात चित्ते आले ठिक आहे…ते वाढावेत, पशूधन वाढावे हेही ठीक आहे परंतु यातून लोकांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का? वेदांताचे काय होणार आहे ते सांगा… तरुणांच्या हाताला नोकरी मिळण्यासाठी अजून किती लाख कोटीची गुंतवणूक येणार हे सांगा असा रोखठोक सवालही अजित पवार यांनी केला.
