लवकरच मुंबई महानगरपालीकेवरही ‘आप’चा झेंडा फडकवू..

0
IMG-20220815-WA0030

लवकरच मुंबई महानगरपालीकेवरही ‘आप’चा झेंडा फडकवू..

मुंबई, दि. 15 ऑगस्ट :-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आम आदमी पार्टीने तिरंगा यात्रा काढून मुंबई तिरंगामय केली आहे. आपच्या कार्यकर्त्यांनी अजून जोरदार प्रयत्न केल्यास लवकरच मुंबईकरांचा विश्वास प्राप्त करून मुंबईवरही आपचा झेंडा फडकवू असा विश्वास आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केला. मुंबईत ७५ मोटरसायकलसह ‘आप’च्या माध्यमातून तिरंगा यात्रा काढण्यात आली. याप्रसंगी प्रीती शर्मा मेनन बोलत होत्या.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभरात आम आदमी पार्टीच्यामाध्यमातून अनोखे उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईतही ‘आप’च्या माध्यमातून सायन सर्कल ते आझाद मैदान अशी ७५ मोटरसायकलसह भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. ‘आप’च्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी हातात राष्ट्रध्वज घेत राष्ट्रभक्तीने ओतप्रोत होत घोषणा दिल्याने वातावरण देशभक्तीमय झाले होते. तत्पूर्वी मुंबईतील प्रत्येक विधानसभा क्षेत्रामधून मोटरसायकलस्वार सायन येथे दाखल झाले. यानंतर ‘आप’च्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या यात्रेचा शुभारंभ तिरंगा झेंडा दाखवून करण्यात आला. सायन सर्कलपासून आझाद मैदान तिरंगा यात्रा काढण्यात आली. आझाद मैदान येथे प्रीती शर्मा मेनन यांच्या भाषणानंतर तिरंगा यात्रेच्या समारोप करण्यात आला.

भारतीय स्वातंत्र्याला त्याग आणि बलिदानाची फार मोठी पार्श्वभूमी आहे. भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करीत असलो तरी आपण खरंच आज स्वतंत्र आहोत का? याचा प्रत्येक भारतीयाने विचार केला पाहिजे. देश आणि देशाच्या झेंड्याप्रती  आम्हाला आदर आहे. तिरंगा आमची शान आहे, भारत आमचा जीव आहे, आज देशातील अनेक संस्था ज्या राजकीय पद्धतीने वागत आहेत, त्यामुळे कुठे तरी भारतीय नागरीकांचे स्वातंत्र्य, मूलभूत हक्क, अधिकार धोक्यात आले आहेत. त्यामुळे यापुढे लोकशाही टिकवायची असले, तर सामान्य माणसाच्या अर्थात आम आदमीच्या हाती सत्ता द्यायला हवी. मग मुंबई असो वा देश, बदलण्याची क्षमता आमच्यात आहे. आम्ही दिल्ली बदलून दाखवली आहे. त्यामुळे आज मुंबईत तिरंगा फडकावला आहेच, लवकरच मुंबईकरांचा विश्वास प्राप्त करून मुंबईवरही आपचा झेंडा फडकवू, असं मत आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आम आदमी पार्टीचे नेते रुबेल मस्करनेस यांनीही आजादी का अमृत महोत्सवाबद्दल संबोधित करीत कार्यकर्त्यांचे कौतुक केले. यापुढेही एक पाऊल पुढे जाऊन आता मुंबईतील घरा-घरात आप पोहचविण्याचे काम करण्याचे आवाहन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *