शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदेंसोबत !
शिवसेनेचे १२ खासदार एकनाथ शिंदेंसोबत !
नवी दिल्ली, दि. १९ जुलै :
शिवसेनेचे ४० आमदार फोडून भाजपाबरोबर सरकार स्थापन केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आता आपले लक्ष्य खासदारांवर केंद्रीत केले आहे. लोकसभेत वेगळा गट स्थापन करण्यासाठी १२ बंडखोर खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली व गटनेता बदलण्याच्या मागणीचे पत्र दिले. राहुल शेवाळे हे गटनेते व भावना गवळी या मुख्य प्रतोद म्हणून नियुक्त केल्याचे शिंदे गटाने जाहीर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत या १२ खासदारांबरोबर चर्चा केली व नंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिंदे म्हणाले की, २०१९ साली शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती. जे अडीच वर्षापूर्वी झाले पाहिजे होते ते आम्ही आज केले आहे. राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाठिंबा आहे. केंद्र आणि राज्य जेव्हा एकत्र मिळून काम करते तेव्हा प्रगती होते. लोकाभिमुख निर्णय घेण्यात सुरुवात केली आहे.ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्या सुनावणी आहे त्यासंदर्भातील आढावा घेण्यासाठी दिल्लीत आलो आहे.
भाजप आणि शिवसेना युतीसाठी उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींसोबत तब्बल एक तास चर्चा झाली. मलाही युती करायची असे उद्धव ठाकरे त्यावेळी म्हणाले. परंतु उद्धव ठाकरेंकडून विशेष सहकार्य मिळाली नाही असा खुलासा यावेळी राहुल शेवाळे यांनी केला.
