शरद पवारांनी डाव साधला आणि शिवसेना फोडली !

0
pawar

शरद पवारांनी डाव साधला आणि शिवसेना फोडली !

मुंबई, दि. १९ जुलै:

शिवसेनेतून बाहेर पडलेल्या आमदार-खासदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस व शरद पवार यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर रामदास कदम यांनीही शरद पवार आणि अजित पवारांना लक्ष्य केले. शरद पवार यांनीच शिवसेना फोडली असा थेट आरोप रामदास कदम यांनी करत उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरही टीका केली.

 

शिवसेनेतून हकालपट्टी केल्यानंतर प्रतिक्रिया देताना रामदास कदम यांनी आगपाखड केली. ते म्हणाले, हा पक्ष आता बाळासाहेबांच्या विचारांचा राहिला नाही. शरद पवारांनी शेवटी डाव साधला. आमच्या मनात भीती होती तेच झालं. उद्धव ठाकरे म्हणाले होते की बाळासाहेब भोळे आहेत. बाळासाहेब भोळे नव्हते. उद्धव ठाकरे भोळे आहेत. शरद पवारांचा डाव उद्धव ठाकरेंना समजला नाही. शरद पवारांनी आमचा पक्ष फोडला.

शरद पवार शिवसेना कशी फोडत आहेत हे कागदपत्रांसह उद्धव ठाकरेंना सांगितलं होते असा दावा रामदास कदम यांनी केला आहे. १९७० पासून ५२ वर्ष शिवसेनेचे काम केले. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी झगडणारी शिवसेना या बाळासाहेब ठाकरेंच्या घोषवाक्याकडे आकर्षित होऊन पक्षाच्या कामासाठी झोकून दिले.  माझ्या स्वप्नात देखील आलं नव्हतं की माझ्यावर शिवसेना नेतेपदाचा राजीनामा देण्याची वेळ येईल. आमचे उतरते वय आहे. आयुष्याची संध्याकाळ पक्षाच्या माध्यमातून अंधकारमय होईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

उद्धव ठाकरेंना हात जोडून सांगितलं होतं की तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत बसू नका. शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यासोबत संघर्ष करण्यात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आजन्म संघर्ष केला. सगळ्या जगात हिंदु ह्रदयसम्राट म्हणून बाळासाहेबांची ओळख आहे. साहेब गेल्यानंतर त्यांचा मुलगा त्याच राष्ट्रवादी-काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून मुख्यमंत्रीपद स्वीकरतो, असेही कदम म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *