उद्धव ठाकरेंची आमदारांना साद; या चिमण्यांनो परत फिरा !

0
SS UT

उद्धव ठाकरेंची आमदारांना साद; या चिमण्यांनो परत फिरा !

मुंबई, दि. २८ जून :

एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बंडखोरी करून गुवाहाटीला गेलेल्या शिवसेनेच्या आमदारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा आवाहन केले आहे. परत या व समोर बसून बोला, नक्कीच मार्ग निघेल असे आवाहन करताना आपल्यातील अनेकजण आजही माझ्या संपर्कात आहेत असे म्हटले आहे.

बंडखोर आमदारांना केलेल्या आवाहानत उद्धव ठाकरे म्हणतात, शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो, जय महाराष्ट्र !

आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्याबाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत, आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही.  माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे..आपण या, माझ्या समोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान-सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात, बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.

शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला शिंदे गटातून कसा प्रतिसाद मिळतो ते लवकरच कळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *