‘क्रांती गाथा’ आधुनिक तीर्थस्थळ म्हणून परिचित होईल..
‘क्रांती गाथा’ आधुनिक तीर्थस्थळ म्हणून परिचित होईल..
मुंबई, दि. 14 जून :
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतांना क्रांती गाथा दालनाचे उदघाटन हा एक योगायोगच नाही तर एक चांगला मुहूर्त आहे. क्रांतीगाथा हे आधुनिक तीर्थस्थळ म्हणून सर्वांना परिचित होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राजभवन येथे ‘क्रांती गाथा’ भूमिगत दालन व राज्यपालांच्या ‘जलभूषण’ निवासस्थानाच्या उदघाटन पर कार्यक्रमानंतर ते बोलत होते.
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, ‘दिव्यत्वाची जिथे प्रचिती तिथे कर माझे जुळती’ असं म्हटलं जातं. जे स्वातंत्र्य उपभोगतो आहोत त्यासाठी कितीजणांनी आपल्या घरादारावर निखारे ठेवले, किती जणांनी बलिदान दिलं, कितीजणांनी मरण यातना सोसल्या, क्षणभर विचार केला हे असं घडलं नसतं तर आपण हे स्वातंत्र्य उपभोगू शकलो असतो का हा प्रश्न मनात येतो. आपल्याला स्वातंत्र्य असंच नाही मिळाले, ते कुणी आपल्याला आंदण नाही दिलं हे स्वातंत्र्य आपल्याला लढून मिळवावं लागलं आहे. तो इतिहास नुसता जतन नाही तर जिवंत करणं हे आपलं काम आहे.काळ पुढे जात आहे.आपण पारतंत्र्यात १५० वर्षे होतो आता स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, पुढे जात असतांना हा वारसा पुढच्या पिढीला देण्याच काम केलं नाही तर मला वाटतं आपण आपल्या कर्तव्याला मुकतो आहोत. आज एक अप्रतिम काम आपण करत आहोत.

२०१६ ला हे भुयार सापडले. खंदक आणि भुयाराचा आज अप्रतिम उपयोग होतो आहे. तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव यांनी हे भुयार बघण्यास बोलावलं होतं. आता जी फिल्म बघितली त्यात याला तीर्थस्थळ म्हटलं आहे. हे एक तीर्थस्थळच आहे.महाराष्ट्रदिनी आपण एक पुस्तक प्राथमिक स्वरूपात तयार केलं आहे अजून ते पुर्ण व्हायचं आहे. माहिती गोळा होतेय. ज्ञात अज्ञात क्रांतीकारकांची.ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांचे ज्यांनी देशासाठी त्याग केला त्यांचे संकलन व्हायला पाहिजे म्हणून एक पुस्तक आपण तयार करत आहोत. नुसतं बोलत बसण्यापेक्षा क्रांतीकारकांनी ज्या गोष्टी केल्या त्यांच्या त्यागाच्या एक कण जरी काम आपण करू शकलो तरी त्यांचे बलिदान कृतार्थ होई असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
‘जलभूषण’ या राज्यपालांच्या निवासस्थानाचे लोकार्पणही आज होत आहे. काळ बदलत असला तरी या परिसराने इतिहासाच्या पाऊलखुणा नेहमीच जपल्या आहेत. त्याला धक्का न लावता नुतनीकरण करणं, आधुनिक तंत्रज्ञानं हे काम करणं खुप मोठी गोष्ट. कलात्मक नजरेने याकडे पहातांना प्रत्येक ठिकाणी त्याचे सौंदर्य दिसते. इतक्या चांगल्याप्रकारे हे नुतनीकरणाचे काम करण्यात आले आहे. मला या दालनाच्या उदघाटनप्रसंगी उपस्थित रहाता आलं हा माझ्यासाठी सार्थकतेचा क्षण आहे असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
