राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करूया
राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करूया
मुंबई दि. १० जून :
तुम्हा सर्वांचे कष्ट… प्रयत्न… जिद्द… यातूनच आपला पक्ष इथपर्यंत आला आहे याची आम्हा सर्वांना जाणीव असून राष्ट्रवादी हा पक्ष आपल्याला महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष करायचा आहे. यासाठी एकसंघपणे प्रयत्न करूया असे आवाहन प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांना केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २३ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते राष्ट्रवादी भवन येथे १० वाजून १० मिनिटांनी ध्वजारोहण करण्यात आले.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, आपला पक्ष तेवीस वर्षांचा झाला आहे. आपल्या पक्षामध्ये महाराष्ट्रातील नव्या पिढीला भविष्यातील आशा दिसत आहे. अनेक तरूण पक्षात काम करण्यास इच्छुक आहेत. आदरणीय शरद पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे काम सुरु आहे, हे पक्ष वाढण्याचे एकमेव कारण आहे. २३ वर्षांपूर्वी पक्ष स्थापन करताना राज्यात पक्षाच्या ताकदीवर आपली सत्ता स्थापन होईल असा निर्धार केला होता याची आठवणही सांगितली. राज्यातील सर्व घटकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीकडून होईल.
पक्ष स्थापन झाल्यावर प्रांताध्यक्ष होण्याचा मान सर्वप्रथम मला मिळाला. राज्यात पक्षाची कोणतीही बांधणी नसताना काँग्रेस खालोखाल क्रमांक दोनचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठरला. तेव्हापासून पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राज्यातील गोरगरीब जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी आपण काम करत आहोत असे मंत्री छगन भुजबळ यांनी संबोधित करताना सांगितले.
पवारांनी मंडल आयोगाच्या माध्यमातून राज्यात आरक्षण मिळवून दिले. या आरक्षणाला नख लावण्याचे काम काही शक्तींकडून होत आहे. मात्र त्याविरोधात आपण सक्षमपणाने लढा देतोय अशी माहितीही छगन भुजबळ यांनी दिली. देशात निरनिराळ्या प्रश्नांची माहिती असलेले व त्यांची सोडवणूक करण्याची ताकद असलेले नेते म्हणजे आदरणीय पवारसाहेब आहेत. आपण पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची वाटचाल अधिक वेगाने करण्यासाठी प्रयत्नशील राहूया असे आवाहनही छगन भुजबळ यांनी केले.
या कार्यक्रमाला खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार शेखर निकम, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी खासदार माजिद मेमन, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव,नरेंद्र राणे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, अल्पसंख्याक सेल प्रदेशाध्यक्ष मोहम्मद खान पठाण, लीगल सेल प्रदेशाध्यक्ष आशिष देशमुख, ग्रंथालय सेल प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील, सेवा दल कार्याध्यक्ष जानबा म्हस्के, प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक,माजी आमदार प्रकाश गजभिये, माजी आमदार संजय दौंड, आयटी सेल राज्यप्रमुख नीरज महांकाळ, महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर, मुंबई विभागीय महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, मुंबई विभागीय अल्पसंख्याक सेल अध्यक्ष सोहेल सुभेदार, तसेच पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
