दूरदृष्टी, संकल्प व तंत्रज्ञानाधिष्ठीत उपायोजना ही साखर उद्योगासाठी त्रिसूत्री
दूरदृष्टी, संकल्प व तंत्रज्ञानाधिष्ठीत उपायोजना ही साखर उद्योगासाठी त्रिसूत्री…
पुणे, दि. 6 जून :
साखर उद्योगासमोर प्रश्न अनेक आहेत, या प्रश्नांवर चर्चा करून विधायक, अनुकूल, शाश्वत आणि पर्यावरण पूरक उपाययोजना हाती घेऊन त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. त्यासाठी काळ सुसंगत असे सर्वस्पर्शी व्यापक सूक्ष्मनियोजन महत्वाचे आहे. दूरगामी दृष्टी, दृढनिश्चयी धोरणात्मक संकल्प आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाधिष्ठीत उपायोजना या त्रिसुत्रीच्या बळावर साखर उद्योगाला चांगली दिशा देण्यासाठी साखर परिषद महत्वाचे योगदान देईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले.
वसंतदादा साखर इन्स्टिट्युट येथे आयोजित साखर परिषद-२०२२ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.पवार पुढे म्हणाले, भविष्यात ऊसाचे क्षेत्र आणखी वाढणार आहे. त्यामुळे येत्या हंगामात ऊस तोडणीचे नियोजन हंगाम सुरू होण्याआधी करावे लागेल. ऊस तोडणी आणि वाहतूकीचा प्रश्न गंभीर होत आहे. साखर आयुक्तालय आणि साखर कारखान्यांनी योग्य नियोजन करून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी.
देशात कोळसा टंचाईमुळे वीज निर्मिती कमी होत आहे. याचा परिणाम उद्योग आणि शेतीवर होत आहे. ऊसाच्या बगॅसच्या माध्यमातून ३ हजार ६०० मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते. सध्या महाराष्ट्रामध्ये २४७० मेगावॅट स्थापित क्षमतेचे सहवीज निर्मिती प्रकल्प आहेत. त्यापैकी आपण ६५ ते ७० टक्के वीज महावितरणला दिली तरी अंदाजे १६६० मेगावॅट वीज राज्य सरकारला मिळू शकते. यासाठी बगॅस आधारीत प्रकल्पाच्या उभारणीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. सौर ऊर्जेचा उपयोग करणेही आवश्यक आहे. राज्यात सौरऊर्जा निर्मितीसाठी भरपूर वाव आहे,मात्र त्यासाठी निधीची उपलब्धता होणे गरजेचे आहे. केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन इथेनॉल साठवणूकीची क्षमता वाढविणे आणि त्यासाठी गुंतवणूक, रेल्वेने वाहतूक करण्याची योजना आणि इथेनॉल खरेदी याबाबत तेल कंपन्यांचे धोरण अधिक अनुकूल होण्याची गरज आहे..
