काँग्रेसने शिवसेना व राष्ट्रवादीलाही घेतले थेट शिंगावर !

0
IMG-20220405-WA0099

काँग्रेसने शिवसेना व राष्ट्रवादीलाही घेतले थेट शिंगावर !

मुंबई, दि. 19 मे :
महानगरपालिका निवडणुकीसाठी वार्ड पुनर्रचना करताना काँग्रेस पक्षाला विचारात घेतले गेले नाही. मुंबई व पुणे महानगरपालिकेत आघाडीतील मित्रपक्षांनी त्यांच्या सोईनुसार वार्ड रचना केल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. याप्रश्नी योग्य तो तोडगा निघाला नाही तर काँग्रेस पक्ष न्यायालयात जाऊन न्याय मिळवेल, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आघाडीचे सरकार असल्याने सर्व मित्रपक्षांशी चर्चा करुनच प्रभाग रचना करायला हवी. राज्याच्या सत्तेत तीन पक्ष सोबत असताना मित्रपक्षाचे नुकसान होत असेल तर ते योग्य नाही, मित्रपक्षाचे नुकसान होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. या प्रभाग रचनेवर स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. पुण्यातील वार्ड रचनेप्रकरणी काँग्रेस न्यायालयात गेली आहे. मुंबई महानगरपालिका प्रभाग रचनेसंदर्भातही वेळ पडली तर आम्ही कोर्टात जाऊ व न्याय मिळवू. तसेच एक प्रभाग हा तीनचा नाही तर दोनचा असावा अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे.

राज्यसभा निवडणुकीसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, याविषयावर आमची कोणतीही बैठक झालेली नाही, जेव्हा बैठक होईल त्यावेळी राज्यसभा निवडणुकीसंदर्भात बोलू. छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे पण एखादा पक्ष परस्पर काही विधाने करत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आमच्याशी राज्यसभा निवडणुकीसंदर्भात बोलणे झालेले नाही आणि महाविकास आघाडीची संयुक्त बैठकही झालेली नाही. बैठक होईल त्यावेळी राज्यसभा निवडणुकीसंदर्भातील काँग्रेस पक्ष आपली भूमिका स्पष्ट करेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *