दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानगंगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून ज्ञानगंगा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
मुंबई, दि. 18 मे :
मुक्त व दूरस्थ शिक्षण हे आधुनिक युगातील ज्ञानग्रहणाचे पसंतीचे माध्यम झाले आहे. आज अनेक खासगी विद्यापीठे व शिक्षण संस्था देखील दूरस्थ शिक्षणाचा उपयोग करीत आहेत. दूरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठाने शिक्षणाची ज्ञानगंगा जास्तीत जास्त गरीब व गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले.
राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचा २७ वा वार्षिक दीक्षांत समारोह संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते.
ज्ञानदान प्रक्रियेचा वेदकाळापासून आढावा घेताना आगामी काळात मुक्त विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा देखील लाभ घ्यावा. मुक्त विद्यापीठाला नॅकचे ए मानांकन मिळाल्याबद्दल राज्यपालांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने स्थापनेपासून ५० ते ६० लाख पदव्या प्रदान केल्याचे सांगून मुक्त विद्यापीठाने केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता इंदोर, गोवा, हैद्राबाद, दुबई यांसह मराठी लोक जेथे आहेत तेथे पोहोचण्याचा प्रयत्न करावा असे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी मुक्त विद्यापीठाने त्यांच्या नावांचे अध्यासन सुरु करावीत अशी सूचना सामंत यांनी केली. दीक्षांत समारोहात १७६११३ स्नातकांना पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी व पीएच डी प्रदान करण्यात आल्या.
