ईडी काय फक्त महाराष्ट्रातच आहे का ?
ईडी काय फक्त महाराष्ट्रातच आहे का ?
रायगड, उरण दि. ११ एप्रिल :
मविआचे निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला मात्र ते शक्य झाले नाही म्हणून ईडी, इन्कम टॅक्सची धाड टाकली जात आहे. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का ? भाजपचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का ? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून झाली. यावेळी जयंत पाटील म्हणाले, धाडसत्रांना घाबरत नाही म्हणून काही लोक आणखी अस्वस्थ झाले आणि त्यांनी पवारांच्या घरावर दगडफेकीचा हल्ला घडवून आणला. पवार नेहमीच एसटी कामगारांसाठी लढले, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले मात्र काहींनी एसटी कामगारांना भडकावण्याचा प्रयत्न केला. आझाद मैदानात चिथावणीखोर भाषणे दिली, त्यातून हे घडले. सध्या अटक झालेल्या लोकांची चौकशी सुरू आहे. दुध का दुध पानी का पानी होणारच पण यांच्यावर कडक कारवाई करावी.
२०१९ साली विधानसभा निवडणुकीचा काळ होता, सर्व नेते सोडून जात होते. पक्ष काही टिकणार नाही, १०-१५ आमदार निवडून येतील असे भाकित केले गेले मात्र आपले नेते पवारसाहेब बाहेर पडले आणि काँग्रेस व राष्ट्रवादीने १०० आमदार निवडून आणले हेही जयंत पाटील यांनी सांगितले.
चांद्यापासून बांद्यापर्यंत पवारसाहेबांना मानणारे लोक महाराष्ट्रात आहेत त्याच लोकांनी साहेबांवर विश्वास टाकला आणि राज्यात परिवर्तन झाले हेही आवर्जून जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.
अदिती तटकरे पालकमंत्री म्हणून चांगले काम करत आहे, आपण तिला साथ द्या. इथे बुथ कार्यकर्ते घडवा, सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवा जेणेकरून तो माणूस कायमस्वरूपी राष्ट्रवादीशी जोडला जाईल. प्रशांत पाटील अतिशय चांगले काम करत आहे, मला खात्री आहे ते अधिक मेहनत घेऊन या भागात राष्ट्रवादीचा झेंडा रोवेल असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
