लातूर जिल्हयात राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण करा
लातूर जिल्हयात राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण करा.
मुंबई दि. 5 मार्च :
लातूर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिका-यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नव्या उमेदीने लातूर जिल्हयात राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण करा. कार्यकर्त्यांकडून चुकीचे कृत्य किंवा वर्तन होऊ नये किंवा त्यांच्या वक्तव्याने कोणताही घटक नाराज होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

लातूर जिल्हयातील कॉंग्रेसच्या अनेक मान्यवर नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी मार्गदर्शन करताना अजित पवार बोलत होते.
यावेळी बोलताना पवार पुढे म्हणाले, फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांवर शरद पवार काम करत पुढे जात आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची धुरा आम्ही सांभाळत आहोत. पक्षाची स्थापना झाल्यापासून सत्तेत राहिलो आहे. मधली पाच वर्षच विरोधी पक्षात राहिलो. संघटना पुढे नेत असताना सर्वधर्मसमभाव राखून चालले पाहिजे. ८२ वर्षातील पवारांडे सर्व तरुण जाऊन चर्चा करतात असा एकमेव नेता आपल्याजवळ आहे.
राज्यसरकार मोठमोठ्या योजना देण्यासाठी कटिबद्ध आहे. सध्या राज्यात पाण्यासाठी १५ हजार कोटीच्या योजना घेतल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यावेळी म्हणाले की, आपल्या अनुभवाचा फायदा पक्षाला होईल आणि लातूर जिल्हा भक्कमपणे उभा राहिल अशी खात्री आहे. जनाधार वाढवायचा असेल तर असे नेते पक्षात आले पाहिजेत. लातूर विकासासाठी तुमचा अनुभव निश्चितपणे कारणीभूत ठरेल.
लातूरचे माजी नगराध्यक्ष ॲड. व्यंकट बेद्रे, प्रशांत घार यांच्यासह औसा तालुक्याचे एमआयएमचे नेते अफसर अब्बास शेख, माजी नगरसेविका सौ. छायाताई चिंदे, जलीलनाना शेख, उस्मान शेख, ॲड. प्रदीप गंगणे, ॲड. अभिजीत मगर आदींसह इतरांनी प्रवेश केलेल्या सर्वांचे जयंत पाटील यांनी स्वागत केले.
