शिवसेना महाराष्ट्राबाहेर लोकसभेच्या १०० जागा लढवणार
शिवसेना महाराष्ट्राबाहेर लोकसभेच्या १०० जागा लढवणार..
लखनौ, दि. ५ फेब्रुवारी:
शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर निवडणुकीत यश आलेले नाही परंतु दादरा नगर हवेलीच्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराला धुळ चारून शिमोल्लंघन केलेल्या शिवसेनेचा हुरुप वाढला असून आगामी लोकभा निवडणुकीत शिवसेना महाराष्ट्राबाहेर १०० जागांवर निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली.
लखनौ येथे पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले की, शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी मी आलेलो आहे. उत्तर प्रदेश खूप मोठे राज्य आहे. ४०० पेक्षाही जास्त सदस्यसंख्या असलेली देशातील सर्वात मोठी विधानसभा आहे. शिवेसेनेने यंदा ५० उमेदवार मैदानात उतरवले आहेत. आतापर्यंत जेवढे टप्पे झाले त्यात जवळपास २० उमेदवार आहेत आणि येणाऱ्या पाच, सहा आणि सातव्या टप्प्यात ३० उमेदवार उभा राहतील. ४०० विधानसभा सदस्य संख्या असणाऱ्या या राज्यात ५०-६० उमेदवार ही काय फार मोठी संख्या नाही मात्र हे सर्व उमदेवार अतिशय गांभीर्यपूर्वक लढतील. पक्षाचा विस्तार करण्यासाठी आमचे हे पाऊल आहे.
विधानसभा निवडणूक संपल्यानंतर लोकसभेच्या तयारीला लागणार आहोत. उत्तर प्रदेशमध्ये आम्ही १५ ते २० जागांवर लोकसभा निवडणुक लढवणार आहोत, त्याची तयारी सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे की महाराष्ट्राच्याबाहेर यंदा १०० च्या आसपास लोकसभा जागांवर निवडणूक लढवणार आहोत.
