वाईन आणि दारुत जमीन अस्मानाचा फरक !
वाईन आणि दारुत जमीन अस्मानाचा फरक !
पुणे, दि, २९ जानेवारी:
सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी दिल्यावरून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. परंतु वाईन आणि दारुमध्ये जमीन अस्मानाचा फरक असतो. पण काहीजण मद्यराष्ट्र वगैरे बोलून विनाकारण वाद निर्माण करत आहेत. जनतेचे नुकसान होईल असे निर्णय घेणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.
पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, लोकांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. आपल्या राज्यातले अनेक शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळे तयार करतात. द्राक्ष, काजूपासून व इतर फळांपासून वाईन बनवली जाते. आपल्याकडे वाईन पिणाऱ्यांचे प्रमाण अतिशय अल्प आहे. जेवढी वाईन तयार होते, तेवढी आपल्या राज्यात खपत नाही. इतर राज्यांत आणि परदेशात निर्यात होते. पण काहींनी जाणीवपूर्वक मद्य राष्ट्र वगैरे म्हणून त्याला महत्त्व दिलं आहे.
आम्ही सरकारमध्ये काम करत असताना जनतेचे नुकसान होईल असे काही करणार नाही. मध्य प्रदेशने घरपोच दारू पोहोचवण्याचा निर्णय घेतला आपण निर्णय घेताना त्यात दारू नाही, तर वाईन विक्रीसाठी परवानगी दिली आहे. पण काही लोकांनी व्हिडीओ क्लिप वगैरे काढून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न, सरकारबाबत लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असेही पवार म्हणाले.
