‘त्या’ शिवसैनिकाचे अर्धवट स्वप्न एकनाथ शिंदेंनी केले पूर्ण.

0
IMG-20220123-WA0046

‘त्या’ शिवसैनिकाचे अर्धवट स्वप्न एकनाथ शिंदेंनी केले पूर्ण.

मुंबई, दि. 23 जानेवारी :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड येथून तिरुपती बालाजीला पायी चालत जात असताना अचानक निधन झालेले कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचं अर्धवट राहिलेलं घराचं स्वप्न नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन पूर्ण केले .

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून रुईकर यांच्या बीडमधील नवीन घरकुलाचे भूमीपूजन पार पडले. या भूमीपूजन सोहळ्याला व्हीसीद्वारे उपस्थित राहून मंत्री शिंदे यांनी रुईकर कुटुंबियांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना लवकर बरं वाटावं तसेच त्यांना दीर्घायुष्य मिळावं यासाठी बीड जिल्ह्यातील कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांनी पायी तिरुपती बालाजीला जाण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी पायी चालायला सुरुवात देखील केली. मात्र रस्त्यात अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. २६ डिसेंबर रोजी कर्नाटक मधील रायचूर येथे उपचारादरम्यान त्यांचा दुःखद अंत झाला होता. त्यांच्या पश्चात त्यांचे सम्पूर्ण कुटुंब निराधार झाले होते. ही बातमी समजल्यावर संवेदनशील मंत्री अशी ओळख असलेले शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबियांना तातडीने मदत पाठवली होती. तसेच, ही मदत दिल्यावर फोन करून त्यांची विचारपूस देखील केली होती. मात्र, त्यानंतर आज एक पाऊल पुढे जाऊन त्यांनी सुमंत रुईकर यांचं अर्धवट राहिलेलं स्वतःच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं. आज रुईकर यांच्या नवीन घराचं भूमिपूजन बीड येथे पार पडलं.

‘रुईकर यांचा मृत्यूची बातमी ही सगळ्यांसाठीच अतिशय वेदनादायी होती. या एका कट्टर शिवसैनिकाचा असा करूण अंत झाल्याचे पाहून माझे मन हेलावून गेले होते. मात्र, अशा या अवघड परिस्थितीत या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारण्याचा निर्णय शिवसेनेच्या वतीने मी घेतला. तसेच, बीडमधील शिवसेना कार्यकर्त्यांना निर्देश देऊन हे घर लवकरात लवकर बांधून देण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानुसार आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी या घराचे भूमीपूजन होत असल्याचा विशेष आनंद होत आहे,’ असे शिंदे यांनी सांगितले. सुमंत यांनी हे घर बांधण्याचे स्वप्न पाहिले होते, ते त्यांच्या संकल्पनेनुसार बांधून पूर्ण करणे हीच त्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने सगळ्यात मोठी श्रद्धांजली ठरेल असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *