नाना पटोलेंच्या मुद्द्यावर मुंबई भाजपा राजभवनवर !
नाना पटोलेंच्या मुद्द्यावर मुंबई भाजपा राजभवनवर !
मुंबई, दि. 19 जानेवारी :
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय वक्तव्य केले आहे. नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी नाना पटोले यांच्या विरोधात एफ. आय. आर दाखल करून घेण्यास सूचना द्यावी अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली.
नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करण्याकरिता मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवन येथे जाऊन भेट घेतली. त्यावेळी मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नरेंद्र मोदी यांच्याविषयी बेताल वक्तव्य केले असून मुंबई भाजपा यांचा तीव्र निषेध करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेच्या श्रध्दास्थानी आहेत. परंतु देशाच्या पंतप्रधानांबद्दल काँग्रेस समर्थकांच्या मनात एवढा द्वेष आहे की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. हे पंजाब घटनेवरून सिध्द झाले असून ही बाब अत्यंत दुर्देवी आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर त्वरीत कठोर कारवाई करावी अशी मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे केली असल्याचे मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
