…तोपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा पदभार दुसऱ्याकडे सोपवावा !

0
dada bjp

…तोपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा पदभार दुसऱ्याकडे सोपवावा !

कोल्हापूर, दि. १४ जानेवारी:

राज्याला गेले सत्तर दिवस मुख्यमंत्री पूर्णवेळ उपलब्ध नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत कोरोनाच्या प्रश्नावर झालेल्या देशव्यापी बैठकीत मुख्यमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सलाही उपस्थित राहू शकले नाहीत. ते सलग दोन अडीच तास एका जागी बसू शकत नाहीत, अशी माहिती राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे तब्येत बरी होईपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अन्य नेत्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली पाहिजे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, राज्यात कोरोनाची तिसरी लाट आहे. अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशा वेळी निर्णय घेण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपलब्ध नाहीत. संकटाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुढाकार घेऊन काम करणे अपेक्षित आहे. त्यांच्या वतीने कोणी मुख्यमंत्री म्हणून काम करावे हे ठरविण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपण मुख्यमंत्र्यांची तब्येत लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी देवाकडे प्रार्थना करतो पण तब्येत बरी होईपर्यंत त्यांनी अन्य नेत्याकडे पदभार सोपवावा.

मुख्यमंत्री एकदाही मंत्रालयात आले नाहीत. ते गेले ७० दिवस कोणालाही उपलब्ध नाहीत. एसटीचा संप चालू असून ७० पेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. सरकारी भरतीच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका फुटत आहेत. निराशेमुळे तरुणांच्या आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता नाही. त्यांना विमा मिळत नाही आणि नुकसानभरपाईही मिळत नाही. असे असूनही महाराष्ट्राची परिस्थिती चांगली आहे असे संजय राऊत यांना वाटत असेल तर ठीक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *