कोणतेही काम ‘तिळगुळ’ दिल्याशिवाय होतच नाही !

0
CM Maha

कोणतेही काम ‘तिळगुळ’ दिल्याशिवाय होतच नाही !

मुंबई, दि. १४ जानेवारी :

शासकीय किंवा प्रशासकीय कामाबद्दल समज किंवा गैरसमज असा झालेला दिसून येतो की, कोणतेही काम तिळगुळ दिल्याशिवाय होतच नाही आणि आजचा हा कार्यक्रम आहे तो तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला. म्हणून मी म्हटलं की मुहूर्त चांगला आहे कारण इकडे तिळगुळ न देता सुद्धा काम होणारच आहे, असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ सुविधेचे लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, एक अनुभव नेहमी सरकारी कार्यालयात येत असतो, तिकडे गोड बोलणं तर सोडाच, बोलणं देखील खूप अवघड मानलं जातं. लोकांची साधी कामं असतात परंतु ती करणं तर बाजुलाच राहीलं, पण साधं उत्तर देखील मिळत नाही. अशावेळी नागरिकांमध्ये एक वैफल्य येतं. मत मागताना जी लोकं झुकलेली असतात ती मत मिळाल्यानंतर मात्र ताठ होतात. ओळखही विसरतात आणि अशा वेळी हा जो कार्यक्रम आपण आजपासून सुरू करत आहोत तो खरच एक क्रांतीकारक कार्यक्रम आहे.

आजचा मकरसंक्रांतीचा मुहूर्त चागंला आहे, सर्वांना शुभेच्छा तर देतोच आहे आणि मी नेहमी अशी अपेक्षा करतो की, गोड बोलण्यासाठी तीळ-गुळाची अपेक्षा न करता गोड बोललं तर अधिक चांगलं होतं. आजचा हा कार्यक्रम आहे. नेहमी अशा कार्यक्रमाच्या वेळेला एक बोललं जातं, तशी एक प्रथा आहे, की आजचा दिन हा सुवर्णदिन आहे, आजचा दिन सुवर्ण अक्षराने लिहिला जाईल, आजहा हा क्रांतीकारक क्षण आहे. कोणतं विशेषण लावायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *