‘त्या’ ST कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार नाही!
मुंबई, दि. १० जानेवारी:
एस टी कर्मचाऱ्यांचा संप दोन महिन्यानंतरही मिटलेला नसून हा संप मिटावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत आज यासंदर्भात एक बैठक पार पडली. आतापर्यंत कारवाई न झालेले कर्मचारी कामावर परतले तर त्यांच्यावर कारवाई होणार नाही, अशी ग्वाही परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे.
शरद पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांची २२ कर्मचारी संघटनांच्या कृती समितीसोबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक पार पडली.
बैठकीनंतर अनिल परब म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईबाबत आम्ही तीन वेळा मुदत दिली होती. दिलेल्या मुदतीमध्ये कामावर परतणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार नसल्याचे सांगितले होते. आतापर्यंत ज्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झालेली नाही असे कर्मचारी कामावर आल्यावर त्यांच्यावर कारवाई होणार नाही. एसटी सुरु झाल्यांनतर कारवाई झालेल्या कर्मचाऱ्यांबाबत काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा करण्यात येणार आहे.
कृती समितीने पूर्वी दिलेल्या मागण्या मान्य झाल्या होत्या. मागण्या मान्य झाल्यानंतरही विलनीकरणाच्या मुद्द्यावरुन हा संप सुरु आहे. विलनीकरणासंदर्भात तयार करण्यात आलेली समिती १२ आठवड्यात आपला अहवाल सादर करणार आहे. या अहवालाचे पालन कर्मचारी आणि राज्य शासनावर बंधनकारक असणार आहे. कर्मचाऱ्यांना मूळ वेतनात पगारवाढ देण्यात आली आहे. पगारवाढीमध्ये काही तफावत झाली आहे. त्याबाबत कृती समितीसोबत चर्चा करण्यात आली आहे. कृती समितीने सातव्या वेतन आयोगाप्रमाणे पगारवाढ देण्यात यावी अशी मागणी करुन आकडेवारी दिली आहे. या आकडेवारीचा अभ्यास करुन एसटी सुरु झाल्यानंतर निर्णय घेऊ.