शरद पवार यांचा इतिहास खरे बोलण्याचा नाही !
शरद पवार यांचा इतिहास खरे बोलण्याचा नाही !
मुंबई, दि. ३० डिसेंबर :
राज्यातील सत्ताधारी आघाडीतील घटकपक्षांमध्ये आघाडीतून आधी कोणी बाहेर पडायचे आणि भारतीय जनता पार्टीसोबत सरकार कोणी स्थापन करायचे याची चढाओढ सुरू झाली आहे. पण गेल्या दोन वर्षांत आघाडीतील घटकपक्षांनी सामान्यांच्या प्रश्नांकडे केलेले दुर्लक्ष आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना दिलेला त्रास ध्यानात घेता, पक्षाचे कार्यकर्ते कोणत्याही घटक पक्षासोबत जाण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या दाव्याविषयी पत्रकाराने विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले की, मोदींनी ऑफर दिली होती हे सांगायला शरद पवार यांना इतका वेळ का लागला, हा प्रश्न आहे. अशी ऑफर मिळाली असती तर ती नाकारण्याइतका राजकीय असमंजसपणा पवारांचा नाही. पण त्यांचा इतिहास खरे बोलण्याचा नाही.
भाजपा आणि शिवसेनेत अंतर वाढविण्याच्या कामाची शरद पवारांनी जाहीर कबुली दिली आहे. त्यानंतरही शिवसेनेला पवारांबद्दल प्रेम असेल तर ते त्यांना लखलाभ होवो, असा टोला त्यांनी हाणला.
महाविकास आघाडी सरकारकडून भाजपा कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करणे व त्यांना अडकविण्याचा प्रयत्न चालू आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी आघाडी सरकारचे तोंड फुटले. आता दादागिरी करून नितेश राणेंच्या बाबतीत दुसरा प्रयत्न चालू आहे. पण हा प्रयत्न यशस्वी होणार नाही. राणे त्यांना पुरुन उरतील.
ओबीसी आरक्षणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा विधिमंडळात ठराव झाला असला तरी त्यामागे सरकारची ओबीसी आरक्षणापेक्षा स्वतःच्या नेतृत्वाची काळजी आहे. लगेच निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडीचे प्रमुख नेते प्रचारासाठी उपलब्ध असणार नाहीत. एकमेव नेता उपलब्ध होणार नसेल तर निवडणुका पुढे ढकला याला अधिक महत्त्व देऊन ठराव झाला. तथापि, राज्य निवडणूक आयोगाची सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काम करण्याची भूमिका पाहता या ठरावाचा किती परिणाम होईल याची शंका आहे.
विधिमंडळाच्या पाच दिवस चाललेल्या हिवाळी अधिवेशात सामान्य लोकांच्या हिताचे एकही काम सरकारने केले नाही. केवळ ३२००० कोटींच्या पुरवण्या मागण्या मंजूर करून घेणे आणि घाईघाईत १९ विधेयके मंजूर करून घेणे हे काम या सरकारने केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला विधानसभा अध्यक्ष निवडणूक नकोच होती त्यामुळे त्यांनी प्रयत्न केल्याचा फार्स केला.
