ठाकरे सरकारचा चेहरा लोकशाहीचा कृती हुकूमशाहीची !

0
BJP MVA

ठाकरे सरकारचा चेहरा लोकशाहीचा कृती हुकूमशाहीची !

मुंबई, दि. २९ डिसेंबर :

चेहरा लोकशाहीचा आणि कृती मात्र हुकूमशाहीची असे मुख्यमंत्र्यांविना अधिवेशन चालविणारे सरकार राज्यातील जनतेला संकटाच्या दरीत लोटत आहे. भारतीय जनता पार्टी या अहंकारी सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, यासाठी राज्यभर एल्गार आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला.

सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, सर्व प्रकारचे विक्रम मोडीत काढत ठाकरे सरकारने ‘मुख्यमंत्र्यांशिवाय अधिवेशन’ हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. 27 वर्षांच्या माझ्या राजकीय कारकीर्दीत असा मुख्यमंत्री मी पहिल्यांदाच बघितला. बाळासाहेब ठाकरे यांना हट्ट करून अटक केली, तुरुंगात टाकण्याची भाषा केली त्यांच्याच मांडीला मांडी लावून बाळासाहेबांचे सुपुत्र मार्गदर्शकाच्या भूमिकेत बसवतात हे शिवसेना आणि महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.

विधिमंडळ हे कायदे बनविण्याचे पवित्र ठिकाण आहे. कायदे बनवताना किमान सर्व पक्षांसोबत, अनुभवी सदस्यांसोबत चर्चा करणे अपेक्षित आहे. अभ्यासपूर्ण पद्धतीने हे कायदे मांडले जातील अशी धारणा होती, परंतु विद्यापीठ व शैक्षणिक धोरणांबाबत बिल मांडताना विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार न करता आणि भविष्यातील अडचणींकडे कानाडोळा करीत अधिकाऱ्यांनी सुचविले म्हणून मंत्र्यांनी विधिमंडळात बिल प्रस्तुत करणे अत्यंत क्लेशदायक आहे. विद्यापीठ म्हणजे जणू काही युवा सेनेचे अड्डे व्हावीत अशीच धारणा ठेवून कायद्यांमध्ये तरतुदी होत असतील तर ते या राज्यातील जनता सहन करणार नाही.

अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बोलत असताना मंत्री छगन भुजबळ यांनी मध्येच येऊन त्यांचे भाषण आणि कामकाजही थांबविले. ही लोकशाही आणि संसदीय प्रणालीला काळीमा फासणारी घटना आहे त्यामुळे तो दिवस ‘काळा दिवस’ ठरला असेच म्हणावे लागेल.

राज्यपालांना सतत अपमानजनक पद्धतीने वागणूक देणे, त्यांच्याबद्दल अपशब्द बोलणे, विमानातून त्यांना उतरविणे या सगळ्या बाबी राज्याच्या दृष्टीने दुर्दैवी आहेत याकडे लक्ष वेधत सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील पैशांचा विनियोग चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आरोप करीत जनतेच्या हिताच्या विधेयकांवर विरोधी बाकावरून हितकारक सूचना दिल्यानंतरही त्यावर गांभीर्य दाखविले गेले नाही याबाबत दुःख व्यक्त केले.

घटनाबाह्य कृतीची परंपरा महाविकास आघाडी सरकारने सुरू केली तिचा शेवट भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता एल्गार आंदोलनाच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत या आंदोलनामध्ये सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहनही मुनगंटीवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *