आवाजी पद्धतीने मतदानास राज्यपालांचा विरोध !

0
898989

आवाजी पद्धतीने मतदानास राज्यपालांचा विरोध !

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणार ?

मुंबई, दि. २७ डिसेंबर:

ठाकरे सरकार व राजभवन हे पुन्हा एकदा आमने सामने उभे ठाकले आहेत. निमित्त आहे विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक. महाविकास आघाडी सरकारला राज्यपालांनी मोठा धक्का देत विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यास विरोध दर्शवला आहे. राज्यपालांच्या या भूमिकेमुळे ठाकरे सरकारसमोर नवा पेच निर्माण झाला आहे.

महाविकास आघाडीच्यावतीने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व मंत्री छगन भुजबळ यांनी रविवारी या निवडणुकीसंदर्भात राज्यपालांची भेट घेऊन पत्र सादर केले. त्यावर राज्यपालांकडून सोमवारी सरकारला पत्र पाठवून उत्तर कळवण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याचा केलेला नियम बदल घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी राज्य सरकारला कळवले आहे.

राज्यपालांच्या या उत्तरानंतर महाविकास आघाडी सरकारकडून राज्यपालांना तिसरे पत्र पाठवले जाणार असल्याचे समजते. या पत्रात ज्या कायदेशीर बाबींवर राज्यपालांकडून शंका उपस्थित केली जात आहे त्याबाबत सविस्तर मुद्दे मांडले जाणार असल्याचे समजते.

फेब्रुवारीमध्ये नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून हे पद अद्याप रिक्त आहे. हिवाळी अधिवेशनातच अध्यक्षपदाची निवडणूक घेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. परंतु राज्यपालांच्या या पत्राने ही निडणूक लांबणीवर पडते काय अशी शंका उपस्थित केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *